चिन्मय पाटणकर, पुणे : महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत पुण्याच्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे योगदान अनन्यसाधारण आहे. सुमारे सव्वाशे वर्षे ग्रंथोत्तेजनातून महाराष्ट्राच्या बुद्धिवैभवासाठी धडपडणाऱ्या या संस्थेला अर्थोत्तेजनाची गरज आहे. संस्थेकडील दुर्मीळ ८५०० पुस्तकांचा ठेवा जपण्याबरोबरच, नवी इमारत उभारणीसह इतर उपक्रम राबविण्यासाठी संस्थेला आर्थिक पाठबळ हवे आहे.

न्या. महादेव गोविंद रानडे, प्राच्यविद्या पंडित डॉ. रामकृष्ण भांडारकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशा विद्वानांनी ग्रंथोत्तेजन आणि मराठी भाषा समृद्धीसाठी डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेने १८९४ पासून लेखक, भाषांतरकार, ग्रंथांना पुरस्कारांच्या रूपाने उत्तेजन दिले आहे. या सगळ्यांतून महाराष्ट्राची वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडण झाली. महाराष्ट्रातील ही सर्वात जुनी साहित्यिक संस्था मानली जाते. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर संस्थेचे अध्यक्ष, तर डॉ. अविनाश चाफेकर सहकार्यवाह आहेत.

संस्थेला निधीची चणचण भेडसावू लागल्याने अनेक प्रकल्प रखडले असून कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन देणेही अवघड बनले आहे. सदाशिव पेठेतील छोटय़ा जागेतून काम करणाऱ्या या संस्थेला संस्थापक न्या. महादेव गोिवद रानडे यांचे कार्य सखोल पद्धतीने महाराष्ट्रापुढे आणायचे आहे. पुढील वर्षी संस्था शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. त्यानिमित्त संस्थापक न्या. रानडे अध्यासनाची स्थापना करण्यात येणार आहे. रानडे यांच्यावरील बहुखंडी, बहुअंगी समीक्षात्मक ग्रंथ प्रकल्प, दृक्श्राव्य माहितीपट करण्याची संस्थेची योजना आहे. तसेच आदिवासी बोलीभाषा आणि संस्कृतीचे जतन, संस्थेकडे असलेल्या पुस्तकांचे दस्तावेजीकरण, अद्ययावतीकरण अशा कामांसाठी आर्थिक निधीची गरज आहे.

ग्रंथ आणि साहित्यातून महाराष्ट्राचे सांस्कृतिक पोषण करणाऱ्या या संस्थेला दानशूरांनी आर्थिक पाठबळ दिल्यास महाराष्ट्राचा वैचारिक, सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचविणे शक्य असल्याचे संस्थेने म्हटले आहे.