सध्या राज्यात करोना विषाणूने थैमान घातले आहे. त्याचा फैलाव होऊ  नये यासाठी एकामागोमाग एक कायदे लागू होत आहेत. हे सर्व कायदे काय आहेत, ते का पाळावेत, हे सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेणे गरजेचे आहे. कायदे पाळून सरकारला सहकार्य केल्यास करोनाचा फैलाव शक्य तितक्या लवकर थांबवता येईल. सध्या हे कायदे १४ एप्रिलपर्यंत लागू आहेत. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन सरकार पुढील निर्णय घेईल..

साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम १८९७ या कायद्यानुसार  प्रतिबंधात्मक उपाय अमलात आणण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत.  सरकारने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार एक ते सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास व दंडाची शिक्षा होऊ  शकते. करोना संशयितांच्या अलगीकरणासाठी शासकीय व खासगी मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला आहे. रोगाचा फैलाव होऊ  नये म्हणून क्षेत्र प्रतिबंधित करणे, त्या क्षेत्रात नागरिकांच्या प्रस्थान व आगमनास मनाई करणे, वाहतूक बंद करणे, इत्यादी उपाययोजना करण्याची तरतूद आहे. आजाणतेपणी कायदा मोडल्याचे कारण देऊ नही नागरिकांना सुटका करून घेता येणार नाही.

संचारबंदी (कर्फ्यू)

एक किंवा जास्त व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती, हालचालीवर बंदी म्हणजे संचारबंदी. २२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. या वेळी जनतेने स्वयंस्फूर्तीने संचारबंदी पाळणे अपेक्षित होते. त्यानुसार दिवसभर सामान्य नागरिक घराबाहेर पडले नाहीत. औषधांची दुकाने सोडून इतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. लोकल आणि बसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. रेल्वे स्थानकांवरील सर्व प्रवेशद्वारे बंद करून फक्त एक प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाच लोकल प्रवास करण्याची परवानगी होती. ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात होता. जनता कर्फ्यूची मुदत संपताच मुंबई पोलिसांनी आपले अधिकार वापरून सोमवारी पहाटे पाचपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले. हा आदेश फौजदारी दंड संहितेतील १४४ कलमान्वये किंवा या कलमातील तरतुदीचा आधार घेत जारी करण्यात आला होता. त्यामुळे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांना कारवाईचे अधिकार प्राप्त होते.

जमावबंदी

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेशही जारी केले. जमावबंदी म्हणजे पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचे एकत्र येणे, एकत्र येऊन प्रवास करण्यावर बंदी. मुंबई पोलिसांच्या जमावबंदीच्या आदेशांत खासगी, सार्वजनिक ठिकाणांसह प्रार्थनास्थळांचाही उल्लेख आहे. जमावबंदीचे आदेशही फौजदारी दंड संहितेच्या १४४ कलमान्वये जारी केले जातात. युद्ध, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, एखादा अपघात किंवा करोनासारख्या साथरोग परिस्थितीत मानवी आयुष्याला धोका पोहोचेल अशा कृतीला आळा घालण्यासाठी फौजदारी दंड संहितेतील १४४ कलमान्वये पोलीस किंवा तत्सम प्राधिकाऱ्यांना जमावबंदी किंवा संचारबंदीचे आदेश जारी करता येतात. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचे अधिकारही तत्सम प्राधिकाऱ्यांना उपलब्ध होतात. या आदेशांतून किंवा निर्बंधांतून अत्यावश्यक सेवा बजावणारे पोलीस, महापालिका कर्मचारी, आरोग्य सेवेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी, अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करणारी व्यवस्था आणि माध्यमांना सूट दिली जाऊ  शकते. तसेच आणीबाणीच्या प्रसंगांत सर्वसामान्य नागरिकांसाठीही हे निर्बंध शिथिल करता येतात. मात्र ते अधिकार तत्सम प्राधिकाऱ्यांकडे राखीव असतात.

टाळेबंदी (लॉकडाऊन)

जमावबंदी करूनही काही ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता होती. काही नागरिक विनाकारण फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. शिवाय राज्याबाहेरून काही प्रवासी येत होते. त्यामुळे कठोर उपाययोजना म्हणून लोकल तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ा आणि विमानसेवा बंद करण्यात आली आहे. शेअर रिक्षा-टॅक्सी, ओला-उबर सेवा बंद आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच बसने प्रवास करण्याची परवानगी आहे.

सर्व कायद्यांतून खालील गोष्टींना सूट

– पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवा.

– जीवनावश्यक सेवा, पाणीपुरवठा

– अन्न, भाज्या, दूधपुरवठा, शिधा, किराणा मालाची दुकाने

– रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, औषधे यांच्याशी संबंधित संस्था, प्रयोगशाळा,

– दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा

– वीज, पेट्रोल, तेल आणि ऊर्जासंबंधी सेवा

– बँका, स्टॉक एक्स्चेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स, डिपॉझिटरीज, स्टॉक ब्रोकर्स

– माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि त्यासंबंधी सेवा

– प्रसारमाध्यमे

– अन्न, किराणा यांची घरपोच सेवा

– वरील सर्व गोष्टींशी संबंधित गोदामे आणि वाहने

दंगल, युद्ध, साथरोग अशा संकटकाळी सरकारला जनहितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. करोना आता गुणाकार पद्धतीने फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाचे आदेश पाळावेत. प्रवास टाळावा, घरातच राहावे. आवश्यक कारणास्तव बाहेर जायचे असल्यास एकटय़ाने जावे, समूहाने जाऊ  नये.

– पंढरीनाथ वाव्हळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जुहू पोलीस ठाणे</p>