हर्षद कशाळकर

आधी निसर्ग चक्रीवादळ, नंतर करोनाची साथ आणि आता महाडची इमारत दुर्घटना अशा एकामागून एक आपत्ती रायगड जिल्ह्यावर ओढावत असताना, तीन महिलांनी आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पेलली. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि रायगडच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रतिकूल परिस्थिती व्यवस्थित हाताळली आणि प्रशासकीय व्यवस्थापनाची जबाबदारी हाताळण्यात महिलाही कमी नाहीत. याची चुणूक दाखवून दिली.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Bank dispute in private building is in police case filed against Canara Bank management
खाजगी इमारतीतील बँकेचे भांडण पोलिसात, कॅनरा बँकेच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

संकट येतात, तेव्हा ती चहूबाजूनी येतात, अशा प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता नेटाने सामोरे जायचे असते. रायगडकरांना सध्या याचाच प्रत्यय येतोय. आधी निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्याची धुळधाण उडवली.  अर्धा रायगड वादळाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाला. त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २४ हजारांवर पोहोचली. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला महाड, माणगाव, गोरेगाव, रोहा अलिबाग परिसराला पूराचा तडाखा बसला. आणि आता महाड येथे पाच मजली इमारतच कोसळली. संकटांची मालिकाच जणू रायगडकरांच्या मागे लागली आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत तीन महिलांनी रायगड जिल्ह्याच्या प्रशासकीय व्यवस्थापनाची जबाबदारी नेटाने सांभाळली आहे.

रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदिती तटकरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मिळालेल्या संधीला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. निसर्गवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा त्यांनी गावागावात जाऊन आढावा घेतला. लोकांचे प्रश्न शासनस्तरावर मांडले. पाठपुरावा केला आणि वाढीव मदत मंजूर करून घेतली. त्यासाठी लागणारा निधीही आणला. महाड इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच त्या मुंबईतून तात्काळ महाडमध्ये दाखल झाल्या. रात्रभर घटनास्थळावर उभे राहून मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यानंतरही दोन दिवस त्या महाड येथे थांबून प्रशासकीय यंत्रणांचे मनोबल उंचावले, आणि दुर्घटनेतील आपद्ग्रस्त कुटुंबांना धीर दिला. राज्यसराकरकडे पाठपुरावाकरून आपद्ग्रस्तांसाठी शासकीय मदत मंजूर करून घेतली.

इमारत दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी रात्रीच घटनास्थळी दाखल झाल्या. तीन दिवस त्यांनी तिथेच थांबून मदत व बचाव कार्याचे प्रतिनिधीत्व केले. मदत व बचाव यंत्रणामधील समन्वय राखणे, दिवसभरातील शोधकार्याचे नियोजन करणे, संध्याकाळनंतर दिवसभरातील घडामोडीचा राज्यसरकार आणि केंद्र सरकारला अहवाल सादर करणे, महाड मध्ये येणाऱ्या मंत्री आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची व्यवस्था करणे, त्यांना सुरु असेलेल्या शोधकार्याची माहिती देणे, बचाव यंत्रणांना आवश्यक असणारी सामुग्री उपलब्ध करून देणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि जिल्हाधिकारी म्हणून या दुर्घटनेत कार्यरत असणाऱ्या सर्व यंत्रणांचे नेतृत्व करणे यांसारख्या भुमिका त्यांना पार पाडाव्या लागल्या आहेत. आपली कौटुंबिक जबाबदारी बाजूला ठेऊन त्या प्रशासकीय जबाबदारीला प्राधान्य दिले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरम्णाच्या प्रमुख डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रशासकीय जबाबदारी यथोचित पार पाडली. त्या प्रत्यक्ष घटनास्थळावर नसल्या तरी जिल्हाधिकारी कार्यालयातून सुत्रधाराची भुमिका त्यांनी मोठय़ा कौशल्याने बजावली. एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करणे, दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील विविध भागातून रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी तात्काळ रवाना करणे, आपत्ती व्यवस्थापना यंत्रणांना कार्यान्वयित करणे, दुर्घटनाग्रस्तांसाठी रक्ताची व्यवस्था करणे, मदत व बचाव कार्यात स्थानिक आपत्ती प्रतिसाद दलांची मदत घेणे यांसारखी जबाबदारी त्यांनी सांभाळली.

अधिकारी म्हणून जेव्हा महिला एखाद्या पदावर कार्यरत असते. तेव्हा तिला त्या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. महिला असल्याने त्यात सुट मिळत नाही. उलट महिला या मुळातच संवेदनशील असल्याने त्या चांगले काम करु शकतात हे या तिघींनी या आपत्तीच्या काळात दाखवून दिले.