रायगड हा पारंपरिकदृष्टय़ा शेकापचा बालेकिल्ला आता ढासळत चालला आहे. एके काळी कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्याशी शेकापला जुळवून घ्यावे लागले. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने आघाडी घेतल्याने जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या शेकाप व राष्ट्रवादी आघाडीला सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.

स्वबळावर रायगड जिल्हा परिषद जिंकण्याची कुठल्याही पक्षात ताकद राहिलेली नाही. अशा वेळी सर्वच राजकीय पक्षांना जिल्हा परिषद निवडणूक युत्या आणि आघाडय़ांच्या माध्यमातून लढवावी लागणार आहे.  शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना हे प्रमुख पक्ष आहेत. गेल्या दोन वर्षांत भाजपनेही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हा परिषद निवडणूक आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाने घेतला आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसलाही सोबत घेण्याची रणनीती दोन्ही पक्षांनी आखली आहे. उत्तर रायगडातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, सुधागड येथे शेकापची मोठी ताकद आहे, तर दक्षिण रायगडातील रोहा, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे या आघाडीचा दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो.

दुसरीकडे शिवसेना आणि भाजपची युतीबाबत बोलणी सुरू आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. मात्र जागावाटपावर युतीचा निर्णय अवलंबून असणार आहे. पनवेल आणि उरणचा काही भाग वगळता भाजपची फारशी ताकद नाही. मात्र तरीही जादा जागांसाठी भाजप आग्रही आहे. सन्मानजनक जागा मिळाल्या नाही, तर युती करणार नाही, असे सांगत शिवसेनेची कोंडी करण्याचे धोरण सध्या भाजपने अवलंबले आहे.

माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या निधनानंतर रायगडमध्ये काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. मात्र तरीही अलिबाग, पेण, महाड तालुक्यात काँग्रेसने आपले अस्तित्व टिकून ठेवले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत महाडमध्ये काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळाली. राज्यपातळीवर शेकाप आणि राष्ट्रवादीने काँग्रेससोबत जुळवून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असले, तरी अलिबाग आणि पेण तालुक्यांत काँग्रेस पक्ष शिवसेनेशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत आहे, तर महाड आणि पनवेलमध्ये काँग्रेस नेते शेकाप आणि राष्ट्रवादी सोबत आघाडीच्या बाजूने आहेत, त्यामुळे काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर सोयीस्कर भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी वाताहत झाली आहे. महेंद्र दळवी, राजीव साबळे, शाम भोकरे यांच्यासारखे जिल्हा परिषदेतील ज्येष्ठ सदस्य पक्षाला सोडून शिवसेनेच्या कळपात सामील झाले आहेत. रोहा आणि माणगाव तालुक्यांतील मतदारसंघाची संख्या घटल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत भर पडली आहे. रोहा आणि अलिबाग राष्ट्रवादी आणि शेकाप पारंपरिक विरोधी पक्ष असल्याने स्थानिक पातळीवर आघाडीबाबत नाराजी आहे. नऊ तालुक्यांत पक्षाची ताकद क्षीण झाली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीसाठी या अडचणीच्या बाजू असणार आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तटकरे कुटुंबीयांमध्ये मनोमीलन घडवून आणले. सुनील तटकरे यांची कन्या आदिती आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.

पनवेलचा ग्रामीण भाग हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पक्षाचे सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य या तालुक्यातून निवडून येतात हा आजवरचा इतिहास आहे. मात्र तालुक्यातील २९ गावांचा आता पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाची संख्या घटली आहे. पनवेल आणि उरणमध्ये भाजपचे वाढणारे प्रस्थ शेकापसाठी घातक आहे. अशातच शिवसेना-भाजप आणि स्थानिक पातळीवर काँग्रेस अशी महाआघाडी करून अलिबाग, पेण आणि मुरुड तालुक्यांत शेकापची कोंडी करण्याची रणनीती सेना-भाजपने आखली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शेकापला जिल्हा परिषदेत आपले वर्चस्व कायम राखण्याचे कडवे आव्हान आहे.

untitled-12