News Flash

गृहराज्यमंत्र्यांसाठी परीक्षा कठीण?

शिक्षकांच्या विरोधातील पोलीस बळाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांना त्रासदायक

गृहराज्यमंत्र्यांसाठी परीक्षा कठीण?

अमरावती पदवीधर मतदारसंघात शिक्षकांच्या विरोधातील पोलीस बळाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांना त्रासदायक

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असतानाच भाजपचे उमेदवार व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना विरोधकांच्या ‘एकजुटी’चा सामना करावा लागत आहे. औरंगाबाद येथे विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांवर झालेला लाठीमार, नागपूर अधिवेशनादरम्यान संगणक शिक्षकांवर झालेला बळाचा वापर, अंशकालीन कर्मचाऱ्यांचे प्रश्न, अमरावती विद्यापीठाकडे झालेले दुर्लक्ष हे विषय ऐरणीवर आणून विरोधकांनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

यावेळी पदवीधर मतदारसंघात २ लाख ११ हजार इतकी विक्रमी मतदार नोंदणी झाली आहे. प्रथम पसंतीक्रमाच्या बळावर पहिल्याच फेरीत निवडून येण्याचे स्वप्न भाजपचे नेते पाहत असले, तरी विरोधकांनी मात्र दुसऱ्या पसंतीक्रमावरही लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भाजपचे गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवाराच्या गृहजिल्ह्यातून पक्षांतर्गत अडचणींना सामोरे लागत असतानाच इतर जिल्ह्यांमध्ये विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांना खोडून काढण्यात भाजप नेत्यांचा वेळ खर्ची पडत आहे. याशिवाय भाजपमध्ये अंतर्गत कुरबुरी कमी नाहीत.

या निवडणुकीत डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर काँग्रेसचे संजय खोडके, प्रहारचे डॉ. दीपक धोटे, अपक्ष उमेदवार डॉ. अविनाश चौधरी आणि इतर नऊ उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढतीची शक्यता वर्तवली जात असतानाच अन्य उमेदवारांचे उपद्रवमूल्य कुणासाठी नुकसानकारक ठरणार याचे औत्सुक्य आहे. गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते प्रा. बी. टी. देशमुख यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. नुकत्याच झालेल्या प्रचार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बी. टी. देशमुख यांचा आदरपूर्वक उल्लेख करून ते वरिष्ठ सभागृहात नसल्याचे दु:ख आहे, असे वक्तव्य केले होते. अचानकपणे भाजपला बी. टी. देशमुख यांची आठवण का यावी, हा देखील मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे. ३० ऑक्टोबर २०१० रोजी अमरावतीत झालेल्या पत्रकार परिषदेत तत्कालीन विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांनी बी. टी. यांची कारकीर्द निष्प्रभ ठरल्याचा आरोप केला होता. त्यामुळे नेत्यांच्या वक्तव्यांमधील हा विरोधाभास समोर आणला जात आहे.

संघटनांच्या पाठिंब्यावर भर

गेली तीन दशके या मतदारसंघात प्रभाव असलेल्या ‘नुटा’ या संघटनेने या वेळी उमेदवार दिलेला नाही. कुण्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. स्वविवेकाने मतदान करावे, असा निर्णय ‘नुटा’ने घेतला आहे. पण, ‘बुलेटिन’मध्ये सरकारविरोधी सूर व्यक्त झाला आहे. प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनासाठीदेखील तयार राहावे, असे संकेत दिले आहेत. गेल्या वेळी शिक्षक संघटनांमध्ये पडलेली फूट ही डॉ. रणजित पाटील यांच्या पथ्यावर पडली होती. आता शिक्षक, पदवीधरांच्या संघटनांचे खच्चीकरण भाजप करीत असल्याचा आक्षेप घेतला जात असताना काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांनी विविध संघटनांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. सरकारविरोधी मतांची एकजूट करणे हे संजय खोडके आणि अन्य विरोधी उमेदवारांचे लक्ष्य आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, विज्युक्टा, आयटीआय निदेशक संघटना, पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना, शिक्षण संघर्ष समिती अशा संघटनांची भूमिका या वेळी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. सहाशेच्या वर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ५७४ पदे भरण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनदरबारी पडून आहे. रिक्त पदांमुळे कामांची गती मंदावली आहे. दुसरीकडे, डॉ. रणजित पाटील हे सिनेट सभांना उपस्थित राहिले नाही, म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द होते. मनुष्यबळासंदर्भात कुलगुरूंना थेट मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालावे लागते, हा देखील विरोधकांसाठी प्रचाराचा मुद्दा बनला आहे.

भाजपसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यांना शिवसेना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक आघाडीचा पािठबा आहे. मुख्यमंत्र्यांकडील सर्व खाती डॉ. रणजित पाटील यांच्याकडे आहेत. त्यांचा पराभव हा सरकारसाठी नाचक्की ठरेल, म्हणून सर्व शक्ती पणाला लावण्याच्या सूचना प्रचारयंत्रणेला देण्यात आल्या आहेत. डॉ. पाटील हे स्वत: सदनिकांच्या टेरेसवरही प्रचार सभा घेताना दिसत आहेत. समाजमाध्यमांवरही ही निवडणूक गाजत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

संजय खोडके सक्रिय राजकारणात आल्यापासून त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पडद्याआड राहून प्रभावीपणे हाताळल्यानंतर आता त्यांनी थेट िरगणात उडी घेतली आहे. प्रहारचे डॉ. दीपक धोटे यांनी ‘नुटा’मध्ये कार्य केले आहे, पण ते संघटनेपासून दूर झाले. त्यांनीही आमदार बच्चू कडू यांच्या साथीने प्रचार चालवला आहे. डॉ. अविनाश चौधरी यांनी विदर्भ राज्य आघाडीचे समर्थन मिळवून स्वतंत्र झेंडा हाती घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2017 1:55 am

Web Title: article on maharashtra elections 2017 2
Next Stories
1 शेकापच्या बालेकिल्ल्याला घरघर?
2 सव्वासहा कोटींचा टंचाईकृती आराखडा
3 ‘केवळ मतदानाचा हक्क म्हणजे लोकशाही नव्हे’
Just Now!
X