‘सोलापूर’ हेच नाव कायम ठेवण्याची शासनाची अधिकृत भूमिका

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणा गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु तरीदेखील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या विद्यापीठाचे नाव बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भविष्यात जातीय तेढ निर्माण होऊन विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा येऊ नये  यासाठी या विद्यापीठाचे नाव सोलापूर विद्यापीठ असेच कायम राहील, अशी भूमिका तावडे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तर देताना मांडली.

mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

दरम्यान, तावडे यांनी विद्यापीठ नामांतराला अचानकपणे नकारघंटा दिल्याने संतप्त झालेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील चार हुतात्मा पुतळ्यांजवळ एकत्र येत तावडे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी यशवंत सेना व धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांच्या विरोधात घोषणा देताना, धनगर समाजाची कुचेष्टा केल्यास शासनाला महागात पडेल, असा इशारा दिला. या आंदोलनाचे नेतृत्व महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी केले.

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणा गेल्या ५ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे धनगर मेळाव्यात अचानकपणे केली होती. विद्यापीठ नामांतराचा मुद्दा वादग्रस्त आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे नाव विद्यापीठाला द्यावे, अशी सिद्धेश्वर  भक्तांसह वीरशैव लिंगायत समाजाची मागणी आहे. तर अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव या विद्यापीठाला देण्यासाठी धनगर समाजानेही आंदोलन हाती घेतले होते. मुळातच या विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे, यासाठी विविध संस्था व संघटनांचे वेगवेगळे असे तब्बल २८ नावांचे प्रस्ताव आले होते. त्यामुळे हा वादाचा विषय होऊ नये आणि विद्यापीठाच्या विकासालाही बाधा येऊ नये म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने पूर्वीचे सोलापूर विद्यापीठ हेच नाव कायम ठेवावे, अशी शिफारस शासनाकडे केली होती.

या पाश्र्वभूमीवर वीरशैव लिंगायत व धनगर समाजाने एकमेकांच्या विरोधात आंदोलन-प्रतिआंदोलन केल्याने सोलापुरातील सामाजिक शांतता व सुव्यवस्था हा चिंतेचा विषय बनला होता. या वादाच्या परिस्थितीतच गेल्या ५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर जेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी आग्रहाने मांडली गेली, तेव्हा चाणाक्ष मुख्यमंत्र्यांनी अनपेक्षितपणे सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणा करीत धनगर समाजाला तात्पुरता दिलासा दिला होता. तर या घोषणेमुळे धनगर समाजाने जल्लोष केला असताना त्याचवेळी नाराज लिंगायत समाजाने ‘सोलापूर बंद’ची हाक देत मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळले होते. सध्या या विषयावर लिंगायत समाजाने ‘थंड’ राहण्याची भूमिका घेतली असतानाच अचानकपणे विधान परिषदेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शासनाची अधिकृत भूमिका मांडताना सोलापूर विद्यापीठाला सोलापूरचेच नाव कायम राहणार असल्याचे जाहीर केले.

विद्यापीठाकडून ‘सोलापूर’ नावाचाच प्रस्ताव

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणा केल्यानंतर शासनाने त्या अनुषंगाने सोलापूर विद्यापीठाला प्रस्तावदेखील सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विविध राजकीय पक्ष, संघटना व सामाजिक संघटनांकडून आलेल्या निवेदनांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर विद्यापीठाने आपली पूर्वीची ‘सोलापूर’ नावाची भूमिका कायम ठेवत आपला निर्णय शासनाला कळविला, असे तावडे यांनी लेखी दिलेल्या उत्तरात सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली विद्यापीठ नामांतराची घोषणा वाऱ्यावर विरल्याचे मानले जात आहे.