थायलंडमध्ये हत्तीला कृत्रिम पाय बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाला. याच धर्तीवर नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रातील पायाची बोटे गमावलेल्या ‘साहेबराव’ या वाघालाही कृत्रिम पाय बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, साहेबराव या वाघाला कृत्रिम पंजा बसवण्यात अपयश आले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला असता तर तो देशातील पहिला प्रयोग ठरला असता.

शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास साहेबरावाला बेशुद्ध करून हा कृत्रिम पाय बसविण्याचा प्रयोग झाला. पण शुद्धीवर आल्यानंतर साहेबराव वाघाने तो कृत्रिम पंजा काढला. पशुवैद्यकीय डॉक्टरांचे पथक, डॉ सुश्रुत बाभुळकर आणि आंतरराष्ट्रीय डॉक्टरांच्या टीमला अथक प्रयत्नानंतर अपयश आले.

२०१२ मध्ये शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकल्यामुळे महाराजबाग प्राणिसंग्रहालयात उपचारासाठी आलेल्या ‘साहेबराव’ या वाघाच्या पायाची बोटे कापावी लागली. अडीच वर्षांपूर्वी त्याची रवानगी गोरेवाडा बचाव केंद्रात करण्यात आली. वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत या आठ वर्षीय वाघाला डॉ. सुश्रूत बाभूळकर यांनी दत्तक घेतले होते.

मात्र, दत्तक घेऊन ते थांबले नाहीत तर प्रत्यक्षात त्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. थायलंडमध्ये त्यांच्या एका मित्राने पायात समस्या असणाऱ्या हत्तीला दत्तक घेतले होते. त्या हत्तीला कृत्रिम पाय बसवून त्याला चालण्यास सक्षम केले. डॉ. बाभूळकर यांनीही ‘साहेबराव’ला नीट चालता यावे म्हणून त्याला कृत्रिम पाय बसवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना त्यामध्ये अपयश आले आहे.