नाशिक जिल्ह्यात कृत्रिम पावसासाठीच्या प्रयोगावेळी  अग्निबाण आकाशाकडे झेपावलेच नाहीत. एक-दोन अग्निबाण आडवे-तिडवे झेपावल्याने पाहणाऱ्यांची धावपळ उडाली. काही अग्निबाण जागेवर धूर सोडून शांत झाले. अग्निबाण आणताना वाहतुकीमुळे काही दोष झाल्याचे सांगत संयोजकांनी पुढील वेळी ते स्थानिक पातळीवर तयार करून प्रयोग केला जाईल, असे म्हटले आहे. या घडामोडींमुळे पुढील दहा दिवस कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर पडला आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुंबईच्या नॅशनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडिज् संस्थेने अग्निबाणाच्या सहाय्याने ढगांवर रासायनिक घटकांची फवारणी करण्याचे नियोजन केले होते. रविवारी होणारा प्रयोग ढगाळ हवामानाअभावी सोमवारवर ढकलला गेला. तथापि, या दिवशी फारसे काही साध्य होऊ शकले नाही. येवला तालुक्यातील सायगाव येथे प्रयोगाची आधीच जय्यत तयारी करण्यात आली होती.
जीव मुठीत
आदल्या दिवशीच्या तुलनेत यावेळी गर्दी कमी होती. ३०० मीटर परिसरात कोणालाही प्रवेश नव्हता. पहिला अग्निबाण सोडल्यानंतर तो काहिसा वर जाऊन अचानक वेगळ्या दिशेला फिरला आणि उपस्थितांच्या डोक्यावरून पुढे धारातिर्थी पडला. दुसऱ्या अग्निबाणाने यशस्वी उड्डाण केले. पण त्याने किती पल्ला गाठला हे गुलदस्त्यातच राहिले.
औरंगाबादेत उत्सुकता
औरंगाबाद : निरभ्र आकाशात कधी तरी एखादा ढग येतो तेव्हा झाकोळून येते. पाऊस पडेल, असे वातावरण होते. एखादा थेंब पडला. शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत प्रत्येक घटक पावसाची आतुरतेने वाट पाहात असताना कृत्रिम पावसाचा प्रशासकीय खेळ आता चांगलाच रंगला आहे. सोमवारी पोहोचणारी कृत्रिम पावसासाठीची रसायने उशिरापर्यंत विमानतळावर तपासणीत अडकली होती. ती सोडवून घेऊन औरंगाबादला पाठविण्यात आली.