कुठल्याही कलेला रियाज महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊनच चित्रकलेकडे वळले पाहिजे. चित्रकाराने चित्रांद्वारेच स्वत:ची ओळख निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी येथे केले.
कला जगत अ‍ॅकॅडमी ऑफ फाईन आर्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंधरा दिवसांच्या उन्हाळी कला शिबिराचा समारोप तेंडुलकर यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे, शुभंकर कांबळे, मोना कांबळे, उद्योजक चिन्मय सुखटणकर आदी या वेळी उपस्थित होते.
तेंडुलकर म्हणाले, ज्यांना चित्रकार व्हायचे आहे, त्यांनी ही कला आपल्या हातात आहे, या भ्रमात गाफील राहू नये. चित्रकलेत प्रत्येकाची दिशा वेगळी असते, तीच जोपासणे गरजेचे आहे. वेडीवाकडी चित्रे म्हणजे व्यंगचित्रे नव्हे. कमीतकमी रेषांमध्ये जास्तीतजास्त आशय सांगणे हे व्यंगचित्रकाराचे कौशल्य आहे. त्यालाही मोजमाप आहे, लयबद्धता आहे. आपण काढलेल्या चित्रातील उणिवा शोधून काढता आल्या पाहिजेत. त्या समजून घेऊन प्रयत्नपूर्वक दूर करणे गरजेचे आहे असे तेंडुलकर यांनी सांगितले. दिवंगत शिवसेनाप्रमुख तथा ज्येष्ठ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर व्यक्तींची व्यंगचित्रे त्यांनी या वेळी काही क्षणात काढून दाखवली, त्याला उपस्थितांचा जोरदार प्रतिसाद लाभला.
कांबळे यांनी या वेळी संस्थेविषयी माहिती दिली. संस्थेचा नव्या पिढीत कला जागृतीचा प्रयत्न आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. शिबिरात सहभागी झालेल्यांचा या वेळी तेंडुलकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. भगवान राऊत यांनी आभार मानले.