जुन्या पिढीतील बुजुर्ग कलाकारांच्या अभिनयाचे ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून जतन करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने सुरू केलेला प्रकल्प बासनात गुंडाळला गेला आहे. परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याने विरोध केल्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये गेल्या दोन वर्षांत खंड पडला आहे.
रंगभूमीवर आपली नाममुद्रा उमटविणाऱ्या कलाकारांचा अभिनय या क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या नवोदितांना मार्गदर्शक ठरावा या उद्देशातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. ज्येष्ठ कलाकारांचे ‘अर्कायव्हल’ करून त्याचे ग्रंथालय करण्याची भूमिका यामागे होती. नाटय़ परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मोहन जोशी यांनी हा प्रकल्प कार्यान्वित केला आणि त्याची धुरा युवा अभिनेते-दिग्दर्शक योगेश सोमण यांच्याकडे सोपविण्यात आली. आतापर्यंत ३० कलाकारांच्या अभिनयाचे ‘डीव्हीडी’च्या माध्यमातून जतन करण्यात आले असून, आणखी ५५ कलाकारांची प्रतीक्षायादी होती. मात्र, एका जबाबदार पदाधिकाऱ्यानेच विरोध केल्यामुळे हा प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. गेल्या दोन वर्षांत या प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली नाहीत हे वास्तव समोर आले आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि नाटय़ परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांनीच यावर प्रकाशझोत टाकला आहे.
मोहन जोशी म्हणाले, ‘वस्त्रहरण’फेम मच्छिंद्र कांबळी आणि ‘गाढवाचं लग्न’ नाटकातील प्रकाश इनामदार या काळाच्या पडद्याआड गेलेल्या रंगभूमीवरील कलाकारांचे कोणतेही ‘डॉक्युमेंटेशन’ नाटय़ परिषदेकडे उपलब्ध नाही. हा प्रकल्प सुरू करताना नाटय़ परिषदेने ९६ कलाकारांची सूची केली होती. त्यापैकी मा. अविनाश, काळू-बाळू यांच्यासह ३० कलाकारांच्या अभिनयाचे जतन करण्याचे काम योगेश सोमण यांनी मर्यादित निधीमध्ये उत्तम प्रकारे केले आहे. त्यासाठी कलाकारांची वेळ घेणे, रंगमंदिराचे आरक्षण करून संबंधित कलाकाराचे चित्रीकरण या सर्व बाबी योगेश सोमण यांनीच केल्या. या ध्वनिचित्रफिती नाटय़ परिषदेच्या संग्रहामध्ये असाव्यात आणि त्याचा व्यवसाय होऊ नये ही खबरदारी घेतली होती. अर्थात ज्यांनी या प्रकल्पाला विरोध केला त्या परिषदेच्या कोशाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी निधीअभावी हा विरोध केला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
योगेश सोमण म्हणाले, या प्रकल्पांतर्गत डीव्हीडी माध्यमातून ५० मिनिटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. काही वेळा एका डीव्हीडीमध्ये दोन कलाकारांचे जतन करण्यात आले असून एका डीव्हीडीसाठी २३ हजार रुपये खर्च आला आहे. एक वर्षांच्या कालावधीत चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले, मधुकर तोरडमल, जयमाला शिलेदार, गणपत पाटील, आत्माराम भेंडे, यमुनाबाई वाईकर, अनंत वर्तक, रमेश देव, श्रीकांत मोघे, प्रभाकर भावे यांच्या अभिनयाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. पुढच्या टप्प्यातील सुधा करमरकर, दया डोंगरे, सुलभा देशपांडे आणि अरुण काकडे या कलाकारांना नाटय़ परिषदेची पत्रेदेखील गेली होती. मात्र, त्यांचे चित्रीकरण होण्यापूर्वीच हा प्रकल्प रद्दबादल ठरविला गेला.

पुणे शाखेची आघाडी
एकीकडे नाटय़ परिषदेचा हा प्रकल्प बारगळला असला तरी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेने कलाकारांचे जतन करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. एक तासाच्या या डीव्हीडीमध्ये प्रभाकर पणशीकर, लालन सारंग, डॉ. श्रीराम लागू, श्रीकांत मोघे आणि प्रसाद सावकार या रंगकर्मीनी आपला प्रवास उलडगला असून, अध्र्या तासाच्या चित्रीकरणामध्ये त्यांच्या गाजलेल्या भूमिकांच्या क्लिपिंग्जचा समावेश आहे. अजित सातभाई यांचे दिग्दर्शन असून एका डीव्हीडीच्या निर्मितीसाठी ७० हजार रुपये खर्च असल्याची माहिती पुणे शाखेचे कोशाध्यक्ष दीपक रेगे यांनी दिली.