भाजपचे देशमुख आणि राष्ट्रवादीचे लाड यांच्यात लढत

दिगंबर शिंदे, लोकसत्ता

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
Raj thackeray and amit shah meet
राज ठाकरे- अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं? अजित पवार गटातील नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “देवेंद्र फडणवीस…”
jayant patil nilesh lanke
“अहमदनगरमध्ये तुतारी वाजणार”, निलेश लंकेंचा उल्लेख करत जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

सांगली : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, दोन्ही उमेदवार सांगली जिल्ह्य़ातील आहेत. याशिवाय जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील हेसुद्धा सांगलीचेच. यामुळे यंदा या मतदारसंघात सांगलीच्या उमेदवारांमध्येच लढत होईल.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे ग. प्र. प्रधान सरांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर भाजपने आपला वरचष्मा निर्माण केला. भाजपचा हा पारंपरिक गड मागील निवडणुकीवेळी हातातून निसटल्याचे शल्य दूर करण्यासाठी राष्ट्रवादीनेही तुल्यबळ उमेदवार देत असताना सांगली जिल्ह्य़ातील उमेदवारांनाच ताकद अजमावण्याची संधी दिली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ हा पुणे महसुली विभागातील पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्य़ांत विभागला गेला आहे. आजपर्यंत भाजपने हा गड आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे राखण्यात यश मिळवले असले तरी एके काळी या ठिकाणी प्रकाश जावडेकरांसारख्या दिग्गजांचा पराभव करून तिसऱ्या आघाडीतून जनता दलाचे प्रा. शरद पाटील यांनीही विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले होते. मात्र त्यावेळचे संदर्भ वेगळे होते.

भाजपने आतापर्यंत या मतदारसंघातून उमेदवारी देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील क्रियाशील कार्यकर्त्यांचाच प्राधान्याने विचार केला होता. गतवेळी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय चळवळीत कार्यरत असलेल्या चंद्रकांत पाटील यांना संधी दिली होती. त्यांनी कोथरूडमधून विधानसभेत जाण्याचा पर्याय स्वीकारल्यानंतर वारसदार संघाच्या विचारातून घडलेल्या कार्यकर्त्यांला संधी मिळणार की अन्य कोणाला याची उत्सुकता होती. मात्र भाजपने यावेळी प्रथमच रा. स्व. संघाबाहेरील संग्रामसिंह देशमुख यांना मैदानात उतरविले आहे.

स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंडलमध्ये पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या लाड कुटुंबामध्ये यावेळी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांना गेल्या वेळीही पक्षाची उमेदवारी मिळेल याची खात्री वाटत होती. त्यामुळे त्यांनी मतदार नोंदणीपासूनच तयारी केली होती. मात्र अखेरच्या क्षणी सारंग पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी केली. लाड यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय सुकर झाला होता. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपला पहिल्या पसंतीची ५१ हजार ७११, राष्ट्रवादीला ४४ जार ७७० मते मिळाली होती, तर बंडखोरी करून अपक्ष मैदानात उतरलेल्या लाड यांना ३२ हजार ८७६ मते मिळाली होती. मतविभाजनामुळे भाजपचा विजय सुकर झाला होता.

या मतदारसंघामध्ये सुमारे ५ लाख मतदार आहेत. यापैकी सर्वाधिक नोंदणी कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातून झाली आहे. कोल्हापुरातील मतदार संख्या १ लाख तर सांगलीची मतदार संख्या ८५ हजार ते ८६ हजार आहे. यामुळे या जिल्ह्य़ातूनच या मतदारसंघाचे भवितव्य निश्चित होणार आहे. सर्वसाधारण निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये फरक आहे. याचा प्रचार वैयक्तिक पातळीवर करणे गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणे हे मोठे आव्हान असते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांना आपला गड शाबूत राखणे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. राजकीय पातळीवर दोघेही आता तुल्यबळ आहेत. गेल्या वेळची चूक सुधारण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला असला तरी भाजपनेही आजपर्यंत राजकीय संघर्ष टाळून राजकीय वाटचाल करणाऱ्या देशमुखांना मैदानात उतरवून राष्ट्रवादीच्या इच्छाशक्तीला वेसण घालण्याचे काम केले आहे. आता राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. पलूस-कडेगावचे प्रतिनिधित्व करणारे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देशमुखांनी कदमांना पुढे चाल दिली. त्याचा पैरा फेडला जाणार की राजकीय दुश्मनीचा निखारा कायम पेटत ठेवायचा याचा विचार करूनच ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.

या निवडणुकीच्या मैदानात समाजवादी चळवळीचेही मतदार आहेत. त्यांना समोर ठेवून जनता दलाचे प्रा. शरद पाटील हेही मैदानात उतरले आहेत. प्रधान सरांनी समाजवादी चळवळीच्या माध्यमातून तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. जिल्ह्य़ातील या तीन उमेदवारांसह आपच्या वतीने डॉ. अमोल पवार, भाकपतर्फे कॉ. शंकर पुजारी, वंचित आघाडीतून प्रा .सोमनाथ साळुंखे हेही मैदानात उतरले आहेत. एकू णच सांगलीकर उमेदवारांमधील लढत चुरशीची होईल, अशीच चिन्हे आहेत.

*भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांना आपला गड शाबूत राखणे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. राजकीय पातळीवर दोघेही आता तुल्यबळ आहेत.

* गेल्या वेळची चूक सुधारण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला असला तरी भाजपनेही आजपर्यंत राजकीय संघर्ष टाळून राजकीय वाटचाल करणाऱ्या देशमुखांना मैदानात उतरवून राष्ट्रवादीच्या इच्छाशक्तीला वेसण घालण्याचे काम केले आहे. आता राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

* पलूस-कडेगावचे प्रतिनिधित्व करणारे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देशमुखांनी कदमांना पुढे चाल दिली. त्याचा पैरा फेडला जाणार की राजकीय दुश्मनीचा निखारा कायम पेटत ठेवायचा याचा विचार करूनच ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.