|| शफी पठाण

साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांचे सडेतोड प्रतिपादन

कुणीही यावं आणि वाङ्मयबाह्य़ कारणांसाठी किंवा वाङ्मयीन राजकारणासाठी साहित्य संमेलन वेठीला धरावं, हे निंदनीय आहे. झुंडशाहीपुढे नमते घ्यावे लागणे हेदेखील अशोभनयीच आहे, असे सडेतोड प्रतिपादन ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी शुक्रवारी येथे अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलावल्यावरून संमेलन उधळून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांचे निमंत्रण रद्द केले गेल्यानेही साहित्य वर्तुळात जोरदार टीकेची लाट उसळली होती. शेतकरी प्रश्नावरही आंदोलन होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर अरुणा ढेरे यांनी आपले लिखित भाषण बाजूला ठेवून उस्त्फूर्त भाषण केले आणि त्यात समाजातील वाढत्या झुंडशाही प्रवृत्तीची जाहीर चिरफाड केली. झुंडशाहीच्या बळावर कोणी जर आपल्याला भयभीत करीत असेल, तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार का, असा सवालही त्यांनी केला. या धमक्या बळाच्या जोरावर का होईना, पण कोणत्याही विधायक गोष्टींचा आग्रह धरणाऱ्या नव्हेत. साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही अशा कोणा समूहानं दिलेल्या धमक्यांपुढे वाकणं ही शोभनीय गोष्ट नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ढेरे म्हणाल्या की, ‘‘इतर भाषांमध्ये कसदार लेखन करणाऱ्या साहित्यिकाला उद्घाटक म्हणून बोलावणं हा गेल्या काही वर्षांचा एक सुंदर प्रघात आहे. याच कारणानं नयनतारा सहगल यांना आपण आमंत्रित केलं होतं. अखिल भारतीय मराठी माणसांच्यावतीनं त्यांना आमंत्रण दिलं होतं. पण अत्यंत अनुचित पद्धतीनं आपण त्यांना पाठवलेलं आमंत्रणच रद्द केलं. ही अतिशय नामुष्कीची आणि निषेधार्ह गोष्ट आहे. संयोजकांकडून ही गंभीर चूक घडली आहे, यात शंकाच नाही. संमेलन हे सध्याच्या परिस्थितीत सतत साहित्यबाह्य़ शक्तींच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम पुरेशा समजशक्तीनं उचलली गेलीच पाहिजे. ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही. पण त्यामुळे केवळ संयोजन समिती किंवा साहित्य संमेलनच नव्हे, तर समस्त मराठी साहित्यप्रेमींच्या माना खाली जाताहेत, याची गंभीर जाणीव आपल्याला असायला हवी.’’

ढेरे म्हणाल्या की, ‘‘दरवर्षी कोणत्या ना कोणत्या अत्यंत गौण, क्षुद्र आणि अगदी लज्जास्पद करणांनी संमेलनांना वादाचा विषय केले गेले आहे. हे होता कामा नये. भल्या वाचकांनी, निर्मळ साहित्यप्रेमींनी आणि वृत्तीगांभिर्यानं लेखन करणाऱ्यांनी संमेलनाच्या स्वरूपाबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे. काहींनी या अमंगळ वातावरणापासूनच दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि संमेलनाचं स्वरूप नकोशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींनी विकृत होत राहिलं.’’

‘‘साहित्य हा एक उत्सव असतो खरा, पण अनेक कारणांनी आपण त्या आनंदोत्सवाचं स्वरूप गढूळ होऊ दिलं. आपलं दुर्लक्ष, आपला भाबडेपणा, आपली मर्यादित समज, आपलं लहान लहान मोहांना आणि वाङ्मयीन राजकारणाला सहज बळी पडणं, या सगळ्या आणि इतर अनेक कारणांनी आपण हा उत्सव भ्रष्ट होऊ दिला. त्यामुळे साहित्याच्या जगातल्या सगळ्या लहान-थोरांनी एकत्र येणं, नव्या-जुन्या लिहित्या-वाचत्यांना प्रत्यक्ष संवाद साधता येणं आणि त्या निमित्तानं कला-साहित्य-संस्कृती आणि समाज यांच्यासंबंधीचं विचारमंथन होणं, प्रश्न ऐरणीवर आणणं, उपायांची चर्चा जाणत्यांनी केलेली ऐकणं आणि परतताना आपण काल होतो त्यापेक्षा आज थोडे आणखी जाणते, आणखी समृद्ध झालो आहोत, असा अनुभव घेऊन परतणं, हे घडण्यापासून संमेलन क्रमाक्रमानं लांबच जात राहिलं. यावेळी हा उत्सव निर्मळ करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. साहित्य ही आपल्यासाठी एक ठेव आहे आणि आज कधी नव्हे ती ही ठेव तिच्या प्रेरक शक्तींसकट सांभाळण्याची जोखीम तुमच्यामाझ्यावर आली आहे. आजवर आपण इतक्या गांभीर्यानं कधी साहित्याकडे बघितलं नसेल. आपल्या साहित्यकार आणि वाचक या भूमिकांचा फारसा विचारही केला नसेल, पण आज तो करण्याची वेळ आली आहे,’’ असे ढेरे यांनी सांगितले.

नयनतारा सहगल यांच्याविषयी त्या म्हणाल्या की, ‘‘वयाची नव्वदी पार केल्यानंतरही केवळ महाराष्ट्रातल्या निमंत्रणाचा आदर करण्यासाठी नयनतारा सहगल इथे येणार होत्या. त्या भारतीय पातळीवरच्या अत्यंत महत्त्वाच्या लेखिका आहेत आणि वाङ्मयीन व्यवहारात अत्यंत सजगतेनं वावरणाऱ्या, नागरिक म्हणून आणि लेखक म्हणून स्वातंत्र्याचं मोल जाणाणाऱ्या, आपल्या अनुभवसिद्ध मतांचा आग्रही पुरस्कार करणाऱ्या आणि त्यासाठी ताठ कण्यानं उभ्या राहिलेल्या लेखिका आहेत, पण तेवढय़ाच महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मराठी मातीशी त्यांचं मौलिक नातं आहे आणि ते ज्ञानवंतांच्या घराण्यातून पुढे आलेलं नातं आहे.’’

नयनतारा यांचे चुलत आजोबा शंकर पांडुरंग पंडित हे गेल्या शतकातले मान्यवर वेदाभ्यासक. कोकणातल्या एका आडगावी जन्मलेले. शिष्यवृत्त्यांवर शिकलेले. इंग्रजी, संस्कृत आणि लॅटिनवर प्रभुत्व असलेले. उपजिल्हाधिकारी आणि पोरबंदरचे प्रशासक म्हणून कार्य केलेले होते. त्यांनी ऋग्वेदाचं इंग्रजी आणि मराठी भाषांतर केलं होतं. तुकारामांची गाथा पुन:संशोधित करून पाठभेद चिकित्सेसह प्रसिद्ध केली होती. या शंकर पांडुरंग पंडिताचे पुतणे रणजीत सीताराम पंडित यांचा विवाह विजयालक्ष्मी पंडित यांच्याशी झाला. त्यांच्या नयनतारा या कन्या. म्हणजेच पंडित नेहरू यांची ही भाची. स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगणाऱ्या आणि तुरुंगात असतानाच काश्मीरचा राजकवि कल्हणची ‘राजतरंगिणी’ इंग्रजीत अनुवादित करणाऱ्या नयनतारा यांचं साहित्य मराठी वाचकांना फारसं परिचित नाही. त्यांनी हाताळलेले लेखन प्रकार, त्यांचं अनुभवविश्व आणि भारतीय साहित्य जगतातील त्यांचं स्थान या विषयी मराठी वाचकांना फारसा परिचय नाही. या निमित्ताने तो योग आला असता,’’ असेही ढेरे म्हणाल्या.

मी लढणार आहे – वैशाली येडे

साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या मनोगताने सर्वाची मने जिंकली. त्या म्हणाल्या, अडचणीच्या वेळी दिल्लीतील नाही तर गल्लीतीलच बाई कामी येते, हे आज पुन्हा सिद्ध झाले. आम्ही विधवा नाही, तर एकल महिला आहोत. नवरा कमजोर होता तो गेला, मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही, मी विधवा होण्यास व्यवस्था जबाबदार आहे.

झुंडशाहीच्या बळावर कोणी जर आपल्याला भयभीत करीत असेल, तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार का? या धमक्या बळाच्या जोरावर का होईना, पण कोणत्याही विधायक गोष्टींचा आग्रह धरणाऱ्या नव्हेत. साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही अशा कोणा समूहानं दिलेल्या धमक्यांपुढे वाकणं ही शोभनीय गोष्ट नाही.    – डॉ. अरुणा ढेरे