19 October 2019

News Flash

‘कुणी कधीही यावं आणि संमेलन वेठीला धरावं हे चालणार नाही’

झुंडीचं, धर्माचं राजकारण हे त्याजंच आहे असंही मत ढेरे यांनी व्यक्त केलं

कुणीही यावं आणि साहित्य संमेलन वेठीला धरावं हे चालणार नाही, असं म्हणत साहित्य संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखिका अरूणा ढेरे यांनी नयनतारा सहगल प्रकरणावर टीका केली आहे. साहित्यबाह्य प्रकरणांनी संमेलनात वाद निर्माण होणं आणि सहगल यांचं निमंत्रण होणं अत्यंत चुकीचं आहे. निमंत्रण रद्द करणं ही संयोजक मंडळींची चूक आहे असंही ढेरे यांनी म्हटलं आहे.  साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही अशा लोकांमुळे वाद निर्माण होतो ते चुकीचं आहे असं परखड मत ढेरे यांनी व्यक्त केलं. झुंडीचं, धर्माचं राजकारण हे त्याजंच आहे असंही मत ढेरे यांनी व्यक्त केलं.

ज्ञानवंतांचे आवाज आज गहिरेपणाने ऐकण्याची गरज निर्माण झाली आहे. घडलेल्या प्रत्येक प्रकरणात फक्त शासन जबाबदार नसते, जगातील सर्व साहित्यिकांना मराठी साहित्याची दारं खुली आहे. आपल्याला शहाणं काम करणाऱ्या ज्ञानोपसकांची परंपरा आहे, आपल्याकडे डोंगरावएवढं काम केलेल्यांची परंपरा आहे. मात्र अशी माणसे आणि त्यांचं काम विस्मृतीत गेलं आहे असंही ढेरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. काय मोडीत निघालं आहे? काळाजी मागणी काय? याचंही भान माणसाने ठेवलं पाहिजे.

विचारवंतांनी कायम सावध राहणं गरजेचं आहे. इतिहास मोठा आहे अभिमास्पद आहे मात्र वेदनादायी आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. भविष्य महत्त्वाचं आहे माणूस आणि माणुसकी मोठी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कलावंत आणि साहित्यिकांच्याबाबतीत मृत गोष्टी गळून पडल्या पाहिजेत, जुने विचार, जुन्या जाणीवा साहित्यिकांनी झटकून टाकल्या पाहिजेत. आपल्या संवेदना कोरड्या पडू नयेत याचीही काळजीही साहित्यिकांनी घेतली पाहिजे. कोणत्याही तत्त्वज्ञानाशी साहित्यिकाची बांधिलकी नसते. साहित्यिकाशी बांधिलकी त्याच्या जगण्याशी असते. कलेच्याद्वारे येणारा मुक्ततेचा अनुभव हा कलाकाराचा ध्यास असतो असेही मत ढेरे यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले.

नयनतारा सहगल यांचे विचार जपायला आणि जोपासायला हवेत असेही मत अरूणा ढेरे यांनी व्यक्त केले. आपला विवेक जागृत ठेवायला हवा, सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्या इथे आल्या असत्या तर त्यांचे विचार आपल्याला समजू शकले असते. आता त्यांचे भाषण आपल्याला मिळाले आहे मात्र त्या कशाप्रकारे आवाज उठवतात, त्यांनी काय काय अनुभव घेतले आहेत? हे आपल्याला ऐकायला मिळालं असतं असंही ढेरे यांनी म्हटलं आहे.

First Published on January 11, 2019 7:16 pm

Web Title: aruna dhere criticised nayantara sehgal issue in sahitya sammelan