व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश भोसले फरारी, १३२ कोटींचे थकीत कर्ज
बार्शी तालुक्यातील खामगाव येथील कुमुदा-आर्यन साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधींची आíथक फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीकांत गोपाळ नलावडे (रा. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली. कारखान्याचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश भोसले हे फरारी असून, त्यांचा शोध जारी आहे.
बार्शी येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्याशी संबंधित असलेला आर्यन शुगर्स हा खासगी साखर कारखाना चालविण्यासाठी कोल्हापूरच्या डॉ. अविनाश भोसले यांच्या कुमुदा कंपनीला देण्यात आला होता. या कारखान्यावर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे १३२ कोटींचे कर्ज थकीत आहे. डॉ. अविनाश भोसले यांनी चालविण्यासाठी घेतलेल्या या साखर कारखान्यात गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने ऊस पुरवठा केला होता. परंतु, कारखान्याने आजतागायत एक पसाही शेतकऱ्यांना दिला नाही. कारखान्यात तयार झालेल्या साखरेचीही परस्पर विल्हेवाट लावली गेली होती. आमदार दिलीप सोपल यांनीही याबाबत हात वर करून आपली जबाबदारी नसल्याचे सांगितले. त्यामुळे ऊस पुरवठादार शेतकरी चांगलेच अडचणीत आले.
या पाश्र्वभूमीवर जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आंदोलन केले. त्यामुळे साखर आयुक्तांना कुमुदा-आर्यन शुगर्सवर फौजदारी कारवाईचे आश्वासन द्यावे लागले. तत्पूर्वी, शेतकऱ्यांचे देणे अदा करण्यासाठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलाव प्रक्रिया सुरू केली खरी; परंतु त्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हरकत घेतली. दोन-तीन वेळा लिलाव पुकारूनदेखील त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता.
गेल्या १० जानेवारी रोजी अमोल वसंत जाधव (रा. कारी, ता. बार्शी) या शेतकऱ्याने कुमुदा-आर्यन शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश भोसले व उपाध्यक्ष श्रीकांत नलावडे यांच्यासह इतर संबंधितांविरूध्द ५१ लाख ५४ हजार ४९२ रूपयांची वैयक्तिक फसवणूक केल्याची फिर्याद पांगरी पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. भोसले, नलावडे आदींना पकडण्यासाठी चक्रे फिरविली असता अखेर यापकी श्रीकांत नलावडे यांना कोल्हापूर जिल्ह्य़ातील हुपरी येथून अटक करण्यात आली.