रायगड जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ४३ हजाराच्या पार गेली आहे. तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींमध्ये करोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. तर मृतांमध्ये वयस्कर व्यक्तींची संख्या अधिक आहे. लहान मुलांमध्ये करोनाची लागण होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ४३ हजार ०७९ वर पोहोचली आहे. यातील ३६ हजार ६९३ जणांनी करोनावर मात केली आहे. १ हजार १५९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या करोनाचे ५ हजार २२९ करोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. करोनाबाधित होणाऱ्या रुग्णांमध्ये २६ ते ४४ वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी ४२ टक्के रुग्ण या वयोगटातील आहेत. त्याखालोखाल ४५ ते ६० वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक आहे. जवळपास २८ टक्के रुग्ण या वयोगटातील आहे. ६० पेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांची संख्या १३ टक्के आहे. तर १८ ते २५ वयोगटातील रुग्णांचे प्रमाण १० टक्के आहे. ० ते १७ वयोगटातील रुग्णांचे प्रमाण केवळ आठ टक्के आहे. म्हणजेच लहान मुलांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

जिल्ह्यात करोनाची लागण झाल्याने आतापर्यंत १ हजार १५९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ६० पेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांचे प्रमाण ५१ टक्के आहे. ही एक चिंतेची बाब आहे. त्याखालोखाल ४५ ते ६० वयोगटातील ३७ टक्के, २६ ते ४४ वयोगटातील ११ टक्के, तर १८ ते २५ वयोगटातील १ टक्के लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. म्हणजेच वयस्कर लोकांचे करोनामुळे दगावण्याचे प्रमाण कितीतरी जास्त आहे. त्यामुळे वयस्कर व्यक्तींची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात महिलांच्या तुलनेत पुरूषांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. रुग्णामध्ये ६५ टक्के पुरूषांचा तर ३५ टक्के महिलांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये ७२ टक्के पुरूष तर २८ टक्के महिलांचा समावेश आहे.