कंपाउंडरने चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच मुलाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत, संतप्त  गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राची तोडफोड केल्याची घटना आज सकाळी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील झडशी येथील आरोग्य केंद्रात  घडली.

प्राप्त माहितीनुसार, टाकली येथील रहिवासी किशोर नवघरे यांचा मुलगा श्रेयस (16), याचे पोट पहाटे तीन वाजेपासून दुखू लागल्याने त्याला आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. त्यावेळी डॉ.देवगडे हजर नसल्याने तेथील कंपाउंडरने त्यांना  फोनवरून याबाबत कळवले.  मात्र, त्यांना आरोग्य केंद्रात न येता इंजेक्शन व गोळ्या देण्याबाबत फोनवरूनच  कंपाउंडरला सूचना केली. त्यानंतर कंपाउडरने मुलाला इंजेक्शन दिले. यानंतर मुलाला घरी नेण्यात आल्यावर त्याला काही वेळातच असह्य वेदना सुरू झाल्या. त्यावर पुन्हा त्याला उपचारासाठी नेले जात असताना त्याचा वाटेतच मृ्त्यू झाला.

या घटनेमुळे संतप्त  झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांसह  गावकऱ्यांनी कंपाउंडरने मुलाला चुकीचे इंजेक्शन दिल्याचा संशय व्यक्त करत, आरोग्य केंद्राची तोडफोड केली. शिवाय, कंपाउंडरला देखील मारहाण केली. संतप्त नागरिक आरोग्य केंद्राची तोडफोड करू लागल्यावर तातडीने वरिष्ठांनी याबाबत कळवण्यात आले. घटनेची माहिती मिळाताच जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस व अन्यजण घटनास्थळी पोहचले. यावेळी संबंधित  डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली. अद्याप गावात तणावाचे वातावरण असून, ग्रामस्थांकडून डॉक्टरविरोधात कमालीचा रोष व्यक्त होत आहे.