‘चाचा-भतिजा’ने महाराष्ट्राला गुलाम बनवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते, तेच मोदी आणि ‘शरद पवार-अजित पवार’ एकत्र आहेत. आता महाराष्ट्राचे कसे होणार, अशी चिंता ऑल इंडिया मजलिस-ई ईत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवैेसी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील दलित जनतेने आता आपल्यातूनच प्रतिनिधी निवडावा असा सल्लाही त्यांनी दिला. खा. ओवैसी, औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील, पँथर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गंगाधर गाडे व इतर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी जवखेडे येथे भेट दिली व तिहेरी हत्याकांडातील जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर ते नगरच्या सरकारी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात आम्ही कोणासोबत नाही, स्वतंत्र आहोत. राज्यात केवळ २४ जागा लढवल्या तर काँग्रेस ४४ जागांवर घसरली. आम्ही ५० जागा लढवल्या तर त्यांचे कसे होणार, असा प्रश्न ओवैसी यांनी केला.