News Flash

‘भाजप-सेनेची भीती दाखवून काँग्रेस-राष्ट्रवादी मते मागतात’

कराड पालिका निवडणूक प्रचारार्थ एमआयएमच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (संग्रहित छायाचित्र)

खासदार आसुद्दीन ओवेसी यांची टीका

निवडणुका आल्या की भाजप आणि सेनेची भीती दाखवून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमची मते व साथ मागते, पण आम्हाला काय मिळाले तर आरक्षण नावाची गाजराची पुंगी, ती किती दिवस वाजणार, आता काँग्रेस आणि भाजप यांचीच छुपी युती असून, त्या दोघांत फरक एवढाच आहे की, एक समोरून तर दुसरा पाठीमागून वार करतो अशी टीका करताना, आजवर मुस्लिमांचा केवळ मतांसाठीच वापर झाल्याची खंत एमआयएमचे अध्यक्ष खासदार आसुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केली.

कराड पालिका निवडणूक प्रचारार्थ एमआयएमच्या जाहीर सभेत ते बोलत होते. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रूपाली लादे, आमदार वारीस पठाण, माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार आदींची यावेळी उपस्थिती होती. ओवेसी म्हणाले की, स्वत:चेच पैसे काढण्यासाठी बँकेच्या दारात आज दिवसभर आम्हाला उभे राहावे लागत आहे. हेच का अच्छे दिन, असा सवाल करून, शंभर दिवसात काळा पैसा भारतात परत आणतो, अशी गर्जना करणाऱ्या मोदींनी बुरे दिन दाखवले. देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसारच चालेल, काँग्रेसने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. त्यांचे दाखवण्याचे आणि खायचे दात वेगळे असल्याची टीका त्यांनी केली. आमदार वारीस पठाण यांनी मुस्लिमांना आरक्षण द्यावे, ही आमची मागणी असल्याचे सांगताना, जर आरक्षण दिले नाही तर ते हिसकावून घेऊ, असा इशारा दिला. भाजपा-शिवसेनेऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हेच आमचे खरे शत्रू असल्याचे आम्ही ओळखले असल्याचे ते म्हणाले.

मोदींच्या सत्तेस काँग्रेसच कारणीभूत

सांगली – मोदी सरकारच्या नोट बंदीमुळे सामान्य जनता कंगाल झाली असून या सरकारला सत्ता देण्यास काँग्रेसच कारणीभूत असल्याची टीका एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांनी इस्लामपुरात झालेल्या जाहीर सभेत केली.

इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना खा. ओवेसी म्हणाले, की पंतप्रधान मोदींनी अचानकपणे हजार, पाचशेच्या नोटा बंद करून गरिबांवरच ‘सर्जकिल स्ट्राईक’ केला आहे. यामुळे सामान्य जनता निर्धन झाली असून अतोनात हाल सुरू आहेत.

‘कॅशलेस इकॉनॉमी’च्या नादात गरीब कंगाल झाला आहे. नोटा बदलासाठी सामान्य, कष्टकरीच रांगेत आहेत, मात्र भ्रष्टाचार करणारे, काळा पसा असणारे या गर्दीपासून अलिप्तच आहेत.

या वेळी ‘एमआयएम’चे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यासपीठावर आ. इम्तियाज जलील, आ. वाशिम पठाण, सईद मोईन, अंजुम इनामदार आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 1:33 am

Web Title: asaduddin owaisi slam on congress ncp
Next Stories
1 बालसाहित्याने मुलांच्या ‘माणूसपणा’ला हात घालावा!
2 बोगस पटसंख्या दाखवून आदिवासी आश्रमशाळेत अनुदानाची लूट
3 ‘मेळघाट पॅटर्न’ कागदावरच!
Just Now!
X