26 February 2021

News Flash

वस्त्रोद्योगात ‘अच्छे दिन’ची चाहूल!

वीज दरात सवलत, यंत्रमागावर मात्र खप्पामर्जी

|| दयानंद लिपारे

वीज दरात सवलत, यंत्रमागावर मात्र खप्पामर्जी

राज्यातील उद्योजकांनी वीज दरवाढीवरून शासनावर टीकास्र डागले असताना तिकडे राजधानीत वस्त्रोद्योगाला वीज दरात सवलत देण्याचा निर्णय घेतला गेला. सूतगिरण्यांना प्रति युनिट तीन रुपयांची घसघशीत सवलत मिळाली असताना आजवर वीज सवलतींपासून वंचित राहिलेल्या ‘सायझिंग’ या घटकाला प्रथमच समाविष्ट केले आहे. प्रोसेसिंग,  निटिंग, होजीअरी, गारमेंट व इतर घटकांना वीज दरात सवलत मिळाल्याने वस्त्रोद्योगाला ‘अच्छे दिन’ची चाहूल लागली आहे.

वित्त विभागाने याबाबत गंभीर आक्षेप नोंदवले असतानाही आमदार सुरेश हाळवणकर यांनी वित्त विभागातील अधिकाऱ्यांशी संघर्ष करून ही सवलत मिळवण्यात पुढचे पाऊल टाकले आहे.  वीजदरवाढीच्या धक्कय़ाने सर्वच उद्योग घटकांना जबर धक्का बसला आहे. शेतीनंतर रोजगार पुरवण्यात दुसऱ्या स्थानी असलेल्या वस्त्रोद्योगालाही याची जबर झळ  बसली आहे. आता या शासन निर्णयाने यंत्रमाग वीज ग्राहकांना १ रुपया, सायझिग, प्रोसेसिंग, गारमेंट, आधुनिक यंत्रमाग ग्राहक व इतर घटकांना २ रुपया प्रतियुनिट सवलत मिळेल. दोन वर्षांपूर्वी वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी यंत्रमागाच्या वीज दरात एक रुपया आणि व्याजात ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घोषित केला होता. त्यामुळे विलंबानंतर का होईना पण ही सवलत पदरात पडत आहे.

सूतगिरण्यांकडून स्वागत

राज्य शासनाने सूतगिरण्यांना प्रति युनिट तीन रुपयांची सवलत दिली आहे. वस्त्रोद्योगात सर्वाधिक सवलत याच घटकाला मिळाली असल्याने स्वाभाविकच त्याचे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी स्वानुभव सांगत स्वागत केले. त्यांच्या व्यंकटेश्वर सहकारी सूतगिरणीमध्ये ११ हजार चात्या आहेत. त्याचे सध्या मासिक ३५ लाख रुपये देयक येते, आता या सवलतींमुळे सुमारे १० लाख रुपये वाचतील. मंदीच्या काळात शासनाच्या निर्णयामुळे सूतगिरण्यांना सावरण्यास मदत होईल, असा विश्वास अशोक स्वामी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. राज्यातील ७४ सहकारी आणि ८४ खासगी गिरण्यांना याचा लाभ होणार आहे.

यंत्रमागधारक असमाधानी

वस्त्रोद्योगातील बहुतेक घटकांत स्वागतार्ह प्रतिक्रिया असताना यंत्रमागधारक नाराज झाला आहे. राज्यात ९२ हजार यंत्रमागधारक असून १२ लाख यंत्रमाग आहेत. यंत्रमागाची सव्वा रुपया प्रति युनिट वीज महाग पडणार आहे, अशा प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटल्या. याबाबत वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले, ‘२७ अश्वशक्ती खाली असणाऱ्या (प्रति युनिट ३ रुपये) यंत्रमागाची सवलत काढून घेऊन ती २७ अश्वशक्तीपेक्षा अधिक (प्रति युनिट ५.२५ रुपये) वापर करणाऱ्या धारकांवर लादली असून हा अन्याय झाला असून तो दूर करावा. शासनाने १५ फेब्रुवारीला वीज दरात सवलत जाहीर केली, तेव्हा असलेला दर कायम ठेवून सवलत दिली पाहिजे’, अशी मागणी त्यांनी केली.

तफावत दूर करणार

अत्याधुनिक यंत्रमागधारकांना वीज दरात ४.२७ रुपये तर साध्या यंत्रमागधारकांना २.७७ रुपये अनुदान मिळत होते. ही तफावत मोठी असल्याने वित्त विभागाने याबाबत गंभीर आक्षेप नोंदवून दोन्ही प्रकारच्या यंत्रमागधारकाचे अनुदान समान करण्याचा आदेश दिला होता. त्यास अनुसरून २७ ते १०७ अश्वशक्तीपर्यंत वीज वापर करणाऱ्या धारकांना मिळणारे ४.२७ रुपये अनुदान १.२७ पैशांनी कमी करून ३ रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योगाच्या आधुनिकीकरणाची गती मंदावण्याची शक्यता व्यक्त करून आमदार सुरेश हाळवणकर यांनी सवलत दर पूर्ववत ठेवण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री, मुख्यमंत्री यांना भेटून विनंती करण्यात येणार असल्याचे शनिवारी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 12:06 am

Web Title: asche din textile industry
Next Stories
1 साखर अनुदानाचा निर्णयही अपयशाकडे!
2 हातकणंगले मतदारसंघात प्रत्येक वेळी नवी समीकरणे
3 आदित्य ठाकरे यांचे राम मंदिरासाठी साकडे
Just Now!
X