मुंबई-बडोदा मार्गाच्या कामांमुळे मासेमारी, शेती व्यवसायावर परिणाम होण्याची भीती

डहाणू : वाणगाव ते डहाणूदरम्यान कापशी येथे मुंबई-बडोदा रेल्वे मालवाहतूक मार्गाचे (रेल्वे गुड्स कॉरिडॉर) काम सुरू असून भराव टाकण्यासाठी माती व मुरुमाऐवजी सर्रास राखेचा वापर केला जात आहे. भरावासाठी वापरलेली राख बंधारे, नाले यांच्यामार्फत खाडीमध्ये पसरून जलप्रदूषणाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या राखेचा परिणाम पारंपरिक मासेमारी व शेतीवर होण्याची भीती निर्माण झाली असून स्थानिक रहिवाशांनी राखेच्या भरावाला तीव्र विरोध केला आहे.

डहाणू येथील अदानी औष्णिक विद्युत प्रकल्पातून बाहेर पडणारी राख एजन्सींना ठेकेपद्धतीने दिली जाते. रेल्वे मालवाहतूक मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी या राखेचाच वापर भराव करण्यासाठी केला आहे. कापशी येथे सुरू असलेल्या कामात मोठय़ा प्रमाणात राख वापरली गेली आहे. राखेमुळे मातीचा दर्जा खालवला जातो आणि त्याचा परिणाम शेतीवर होतो, असे स्थानिकांनी सांगितले. सध्या या कामासाठी ट्रकमधून राख नेली जात आहे. आसनगाव-वानगाव या अरुंद मार्गावरून ही राख नेली जात असल्याने प्रचंड प्रमाणात राख उडते आणि त्याचा त्रास इतर वाहनचालकांना होत आहे. खड्डय़ामधून किंवा गतिरोधकावरून राखवाहू ट्रक जाताना ही राख मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर पडते. याचा त्रास रस्त्यावरून प्रवास करणारे पादचारी, शाळकरी विद्यार्थी यांना होत आहे. ही राख धोकादायक असून त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात, असे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाला याबाबत विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

मुंबई-बडोदा रेल्वे मालवाहतूक मार्गाचे काम वाणगाव पूर्वेकडे सुरू आहे. मात्र भराव टाकण्यासाठी मातीऐवजी राखेचा वापर केला जात आहे. याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे.

– राहुल पडगे, रहिवासी, कापशी

वाणगाव रेल्वे स्थानकालगत रेल्वे प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी राखेचा भराव करत आसल्याची माहिती समोर आली आहे. त्याची योग्य चौकशी करून अहवाल पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येईल.

– नरेश नार्वेकर, तलाठी, वाणगाव