|| मंदार लोहोकरे

वेळेत कामे पूर्ण झाल्यास निधीचा विनियोग शक्य; भाविकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याची मागणी

Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

राज्यात जसे पावसाळ्याचे वेध लागतात तसे वारकरी संप्रदायाला आषाढीचे वेध लागतात. पंढरीत भाविक दाखल होईपर्यंत कामे सुरू असतात. आषाढी यात्रेचा मुख्य दिवस म्हणजेच एकादशी २३ जुलै रोजी आहे. अजूनही ४५ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सादरीकरणापेक्षा कामे वेळेत पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे. तरच कोटय़वधी रुपयांचा विनियोग होईल आणि विकासदेखील झालेला दिसेल.

वारकरी संप्रदायातील चार वारींपैकी एक आषाढी वारी महत्त्वाची मानली जाते. संतांच्या पालख्यांचे प्रस्थान ठरलेल्या तिथीला. मुक्काम, जाण्याचा मार्ग, रिंगण हेसुद्धा शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरानुसारच होतात, तर दर वर्षी चैत्र दशमीला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मठात बैठक होऊन वारकरी आषाढीच्या तयारीला लागतात. म्हणजे तब्बल चार महिने आधी तयारी सुरू होते.

पंढरपुरात गेल्या काही वर्षांपासून भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. आषाढी यात्रेचा विचार केला तर भाविक साधारणपणे एकादशीच्या आधी ३ ते ४ दिवस येत आहेत. नेमके याच काळात मंदिर समिती, पालिका, पोलीस, बांधकाम विभाग यांच्या कामाची धावपळ सुरू असते. शहरातील रस्त्यांची डागडुजी, स्वच्छता, मंदिर समितीची कामे, पोलीस बंदोबस्त सुरू असतात. गेल्या काही वर्षांपासून बदल होत आहे. प्रमुख संतांच्या पालख्या जिल्ह्य़ात आल्यावर भाविक पंढरपूरला येतात, दर्शन करून पुन्हा पालखीबरोबर चालत येतात. त्यामुळे प्रशासनाने बदल करून यात्रेचे नियोजन आधी करावे, जेणेकरून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होतील. तसेच राज्यात सर्वदूर पावसाने जरी हजेरी लावली तरी आषाढी दशमी, एकादशीला पाऊस पंढरीत पडतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे यात्रेसाठी भाविक पंढरीत दाखल झाल्यावर चंद्रभागा नदीपात्र कोरडे असते. गेली अनेक वर्षे उजनी धरणातून आषाढी यात्रेसाठी साधारणपणे एकादशीच्या आधी दोन-तीन दिवस नदीला पाणी सोडले जाते. पुढे नदीपात्रात काही दिवस असते. तेच पाण्याचे नियोजन आधी केले तर भाविकांना स्नान करता येईल. तसेच तात्पुरते शौचालयदेखील उभारले जाते. हेदेखील दोन-तीन दिवस आधी. त्यामुळे तीही समस्या दरवर्षीच असते.

मुळात पंढरपुरात शौचालय उभारणी आणि त्यासाठी  ८१ कोटी रुपये खर्च केले आहेत. शहरात ज्या ठिकाणी शौचालय उभारणी केली ती जागा चुकीची आहे. ती शौचालये दुमजली, तिमजली आहेत. यात्रेला येणाऱ्या भाविकांत वयोवृद्ध भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिना चढ-उतार करणे सर्वाना शक्य नाही. पर्यायाने त्याचा वापर होत नाही. त्याही पुढे जाऊन चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर ६५ एकर जागेत भाविकांची राहण्याची सोय केली आहे. त्या ठिकाणी भाविक राहतात एका ठिकाणी आणि शौचालय दुसऱ्या टोकाला बांधले आहे. त्यामुळे त्याचा वापर किती होणार? मग कोटय़वधी रुपये खर्च करून सरकारने काय सिद्ध केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी घुसखोरी नित्याची झाली आहे. हे रोखण्यासाठी मंदिर समिती पूर्णपणे अपयशी ठरते. याचे खापर भाविकांवर फोडून समिती हात वर करते.

विभागीय आयुक्तांकडून अपेक्षा

पुण्याचे विभागीय आयुक्तपदी डॉ. दीपक म्हेसेकर रुजू झाले आहेत. नांदेडमध्ये २००८ ला गुरु ता गद्दी कार्यक्रम पार पडला. त्या वेळेस म्हेसेकर नांदेड महापालिकेचे आयुक्त होते. त्या वेळेस अनेक विकासकामे झाली. तो अनुभव पाहता आता पंढरपूरच्या विकासकामाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. वारी संदर्भात पुणे आणि पंढरपूर येथे कामांची पाहणी करून बैठक घेतली. यात्रा कालवधीत उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी समन्वय साधण्यासाठी नियुक्त केला. मात्र त्यांनी प्रशासनाकडून कामे पूर्ण करून घेताना प्रसंगी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे.

दर्जेदार काम महत्त्वाचे

समस्या सोडविण्यासाठी त्याबाबत पाठपुरावा, नियोजन, काम करून घेणे यांसारख्या उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी मंत्री, अधिकारी यांनी लक्ष घातले पाहिजे. राज्य सरकारने अनेक घोषणा केल्या. मंदिर समितीचे अध्यक्षदेखील घोषणा करण्यात मागे पडले नाहीत. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. कदाचित पुढच्या आषाढीच्या वेळेस निवडणुका झाल्या असतील. तेव्हा जरी आषाढी यात्रा जवळ आली असली तर अजून ४५ दिवस शिल्लक आहेत. मंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून कामे वेळेत, दर्जेदार आणि पारदर्शक होतील याकडे पाहिले पाहिजे. सरतेशेवटी येणारा भाविक हा ‘जातो माघारी पंढरी नाथा.. तुझे दर्शन झाले आता’’, अशी आर्त विनवणी करीत परततो. अशा भाविकांसाठी तरी चांगले काम व्हावे, एवढीच माफक अपेक्षा.

पंढरीत येणाऱ्या भाविकांसाठी शासन कोटय़वधी रुपये खर्च करते. मात्र त्याचा विनियोग होतो का? याची तपासणी करीत नाही. वारकरी संप्रदायातील महत्त्वाची पायी यात्रा म्हणून आषाढी यात्रेला ओळखले जाते. या यात्रेच्या नियोजनात बदल होणे गरजेचे आहे. एकादशीच्या आधी येणाऱ्या भाविकांसाठी नियोजन केले पाहिजे. तसेच नुकतेच राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेल्या मंदिर समितीच्या अध्यक्षांनी भाविकांच्या सोयीसाठी प्रयत्न करावेत.    – रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, राष्ट्रीय प्रवक्ता; वारकरी संप्रदाय पाईक संघ.