भाजप आमदार आशीष देशमुख यांचा टोला

पक्षश्रेष्ठींनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे, पण त्याला उत्तर देण्याची गरजही वाटत नाही. अशा स्पष्ट शब्दात भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी श्रेष्ठींना आव्हान देतानाच, लाट येते तशी ती ओसरतेही, असा टोला लगावला.

स्वतंत्र विदर्भासाठी एल्गार पुकारणारे आमदार देशमुख विदर्भ आत्मबळ यात्रेनिमित्त दौऱ्यावर आहेत. वर्धा जिल्हय़ात त्यांनी पत्रकार परिषद घेताना आपली भूमिका स्पष्ट केली.

सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भ स्थापन करण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्या आधारावर विधानसभेच्या ४४ जागा जिंकल्या, पण सत्ता प्राप्त होताच दिलेल्या आश्वासनापासून पळ काढणे सुरू आहे. विधानसभा निवडणुकीस अद्याप अवकाश आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांना अनेक पत्रे दिली, पण उत्तर मिळाले नाही. माझ्यावर कारणे दाखवा नोटीस मात्र बजावण्यात आली. आपली काहीच चूक नाही. विशिष्ट ठिकाणी (संघ मुख्यालय) भेट देण्याची सूचना मला मान्य नव्हती. हा पक्षद्रोह ठरत नाही. त्यामुळे मी नोटीशीला उत्तर दिले नाही, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. शासनाच्या दारात आत्महत्या होत आहे, पण त्याविषयी सरकार संवेदनशील नाही. एकटे तेलंगणा राज्य मोफत वीज देतानाच शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी २६ हजार कोटी रुपयाची तरतूद करते. मात्र, महाराष्ट्रात फक्त सात हजार कोटीचीच तरतूद आहे. शेतकऱ्यांविषयी काहीच कळवळा नसल्याने विदर्भातील बोंडअळीने नासलेल्या शेतीला मदत मिळाली नाही. सोयाबीनला ग्रहण लागले, पण नुकसानभरपाई नाहीच. विदर्भाचे भले करण्याचे आश्वासने देणारी सत्ताधारी मंडळी विदर्भावरच अन्याय करीत आहेत. त्यामुळे हताश शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असून शेतकऱ्यांच्या विविध समस्या निदर्शनास येत आहेत असे आमदार देशमुख यांनी नमूद केले. काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी राजेंद्र शर्मा, इक्राम हुसैन व अन्य यावेळी उपस्थित होते.

भाजपने स्वतंत्र विदर्भाची घोषणा करावी

स्वतंत्र विदर्भाचा विरोधक म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेने पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. त्यामुळे आता भाजपला स्वत:चे धोरण अंमलात आणण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांनी स्वतंत्र विदर्भाची घोषणा करावी. केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार असल्याने भाजपश्रेष्ठींना स्वतंत्र राज्य देण्यात अडचण नाही. त्यांच्याकडे इच्छाशक्ती हवी. स्वतंत्र विदर्भ झाल्याखेरीज इथला मागासलेपणा दूर होणार नाही. महाराष्ट्रावर साडेचार लाख कोटी रुपयाचे कर्ज आहे. समृद्धी व अन्य प्रकल्पांमुळे परत तीन लाख कोटी रुपयाचे कर्ज होणार आहे. साडेसात लाख कोटी रुपयाचे कर्ज घेणाऱ्या महाराष्ट्रातून विदर्भाच्या वाटय़ाला मात्र काहीच येत नाही. विविध जमिनीचे अधिग्रहण करताना योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकरी कमालीचे हताश झाले आहेत.