राज्यातील बांधकाम प्रकल्पांना आकारण्यात येणाऱ्या प्रिमीयमवरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. रेडिरेकनरची फाईल जशी पुणे-मुंबई प्रवासात लक्ष्मी दर्शन करीत आली तशीच आता मंत्रालयातून कुठल्या बंगल्यावर लक्ष्मी दर्शन करीत फिरतेय?, राज्यात करोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर?,” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

बांधकाम प्रकल्पांना आकारण्यात येणारा प्रिमीयम कमी करण्याचा राज्य शासन विचार करीत असून, यावरून राज्य सरकारवर टीका करताना भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी “राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर,” अशा सूचक शब्दात निशाणा साधला आहे.

“रेडिरेकनरची फाईल जशी पुणे-मुंबई प्रवासात ‘लक्ष्मी दर्शन’ करीत आली तशीच ही फाईल मंत्रालयातून कुठल्या कुठल्या ‘बंगल्यावर लक्ष्मीदर्शन’ करीत फिरतेय? शेतकरी, श्रमिकांच्या प्रश्नांपेक्षा बिल्डरांच्या विषयात सरकारला अधिक रस का? राज्यात करोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर?,” असा सवाल शेलार उपस्थित केला आहे.

“मुंबई, ठाणे, पुणे शहरातील बिल्डरांसाठी राज्य शासन प्रिमीयम कमी करण्याचा घाट घालत आहे. त्यासाठी पारेख कमिटी गठीत करण्यात आली आहे. पण… प्रिमीयम कमी केल्याने महापालिकांचे उत्पन्न घटणार त्याचे काय? सर्वसामान्यांसाठी घराच्या किंमती कमी होणार का?त्या किती कमी होणार?” असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार सातत्यानं राज्यातील करोना परिस्थितीवरून सरकारवर टीका करत आहे. गणेशोत्सवाच्या काळातही सरकारकडून चाकरमान्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं.