लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेते एकमेकांवर टीका करत आहेत. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे असा टोला त्यांनी लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘बारामतीचा पोपट’ असा त्यांचा उल्लेख केला होता. राज ठाकरेंची भाषणं बारामतीहून येतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तेव्हापासून मनसे आणि भाजपा नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. यावेळी त्यांनी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी पक्षाला रामराम केल्यावरुनही टोला लगावला आहे. शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, ‘सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी “फक्त लढ” असे म्‍हटले.!! “शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे”.

आशिष शेलार यांनी यावेळी #ChokidarकेSideEffects असा हॅशटॅग वापरला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा – राज ठाकरे<br />राज ठाकरेंनी वर्धापन दिनी जे भाषण केलं होतं त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ‘राज ठाकरेंची स्क्रिप्ट बारामतीहून येते असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच राज ठाकरे बारामतीचे पोपट आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हटलं आहे. टीका मी केली आणि हे आम्हाला पोपट म्हणतात, देवेंद्र फडणवीस हे म्हणजे हवा गेलेला फुगा आहे. फुगलेल्या फुग्याला जसा कोणताही आकार दिला जातो तशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची आहे’, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.