अभिनेत्री कंगना रणौतनं महाराष्ट्र सरकार व शिवसेनेविरोधात आघाडीच उघडली आहे. शिवसेनेला लक्ष्य करून कंगना सातत्यानं ट्विट करत आहे. त्याचबरोबर माध्यमांशी बोलतानाही सेनेवर टीका करत आहे. कंगनानं शिवसेनेवर टीका करताना खोटं विधान केलं होतं. त्यावरून जोरदार चर्चा रंगलेली असताना भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून भूमिका मांडली आहे.

अभिनेत्री कंगना रणौतनं टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना तिच्या मतदानाविषयीचा किस्सा सांगितला होता. “आपल्याला भाजपाला मतदान करायचं होतं, मात्र तिथे फक्त शिवसेनेचंच चिन्ह होतं. नाईलाजाने आपल्याला शिवसेनेला मतदान करावं लागलं,” असं कंगनानं म्हटलं होतं. त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील पत्रकार कमलेश सुतार यांनीही कंगनाच्या विधानातील चूक लक्षात आणून दिली. मात्र, कंगनानं त्यांनाच न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला. नंतर कंगनानं ते ट्विट डिलीटही करुन टाकले.

आणखी वाचा- “…तर मी ट्विटर कायमचं सोडेन”; कंगना रणौतनं दिलं आव्हान

या सगळ्या वादावर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे. “कमलेश सुतार यांने वांद्रे पश्चिम विषयी जी स्टोरी केली, त्यात पत्रकार म्हणून त्याने सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात चूक काहीच नाही. तो माध्यम म्हणून त्याचा अधिकार आहे. हे आता कुणाला नव्याने सांगण्याची गरज नाही. पत्रकार म्हणून सन्मित्र कमलेशला मी अनेक वर्षे ओळखतो,” असं म्हणत शेलार यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा- कंगनानं खरंच शिवसेनेला मतदान केलं का, नेमकं सत्य काय?

विधानामागचं सत्य काय?

कंगनानं केलेल्या विधानाची पडताळणी करण्यात आली. त्यात शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले आहेत. विधानसभा निवडणुकीत कंगनानं वांद्रे पश्चिम आणि लोकसभा निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघामधून मतदान केलं होतं. २००९ ते २०१९ च्या काळात तीन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या निवडणुका शिवसेनेनं महायुतीमध्ये लढवल्या. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीतून बाहेर पडली होती. युती नसल्यामुळे अंतर्गत विधानसभेसाठी वांद्रे पश्चिम आणि लोकसभेसाठी मुंबई-मध्य जागा भाजपाकडे होत्या. त्यामुळे सहाही निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार तिथे नव्हता. त्यामुळे कंगनानं शिवसेनेला मतदान केलं हे विधान खोटं ठरतं.