मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचं व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याच्या रागातून शिवसैनिकांनी सेवानिवृत्त नौदलातील अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे. “मुंबई बाँम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. वा रे वा! विवेकबुद्धी गहाण ठेवली काय? हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की, तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

आणखी वाचा- आता मी जाहीर करतो की, आजपासून मी ‘भाजपा-आरएसएस’ सोबत आहे – मदन शर्मा

आणखी वाचा- ठाकरे सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, राज्यपालांकडे मागणी

उद्धव ठाकरेंबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याच्या कारणावरुन माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी मुंबईत मारहाण करण्यात आली होती. यानंतर १२ सप्टेंबरला या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर पुन्हा अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा- माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी सहा शिवसैनिकांना पुन्हा अटक

शर्मांनी घेतली राज्यपालांची भेट

शिवसैनिकांनी मारहाण केल्याप्रकरणी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज (१५ सप्टेबर) भेट घेतली. “राज्यपालांकडे आपण राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे,” असं त्यांनी भेटीनंतर सांगितलं. भाजपा नेते अतुल भातखळकरदेखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. “महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे,” असं ते म्हणाले आहेत.