विधान परिषद निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरणात रंग भरू लागले आहेत. शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. मात्र, जागावाटपावरून महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून भाजपानं टीका केली असून, “विधान परिषद निवडणुकीवरून सुरू असलेल्या बेबनावात आम्हाला ओढू नका,” अशी टीका भाजपानं केली आहे.

राज्यात मुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळ सदस्यात्वावरून राजकीय पेच निर्माण झाला होता. राज्यपालांकडे शिफारस केल्यानंतर प्रश्न निकाली लागला नाही. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेण्यात आली. आयोगानं परिस्थिती लक्षात घेऊन निवडणुकीची घोषणा केली. त्यामुळे आता राज्यात करोनाच्या संकटामध्येही राजकीय वातावरण गरम होऊ लागलं आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी मतदान होत आहे. यात भाजपाकडून चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, काँग्रेस आणि शिवसेनेत जागा वाटपावरून वाद उभा राहिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रविवारी सुरू होती.

याच विषयावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सन्मान आणि राज्यातील परिस्थिती पाहता निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात! ती जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. आम्ही आमच्या मतांप्रमाणे उमेदवार दिले आहेत. काँग्रेस ऐकत नाही, यावरून आघाडीत जो बेबनाव सुरू आहे, त्यामध्ये आम्हाला ओढू नका!,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त राज्यात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरुद्ध भाजपा असं समीकरण बघायला मिळणार आहे. विधान निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगळं राजकीय समीकरण निर्माण झालं. ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतही दिसून आलं.