राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षांचा मुद्दा अजूनही निकाली निघालेला नाही. राज्य सरकारनं परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यपालांनी युजीसीच्या नियमाप्रमाणे निर्णय होईल, असं मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केलं होतं. भाजपाचे नेते आशिष शेलार हे याप्रकरणात सातत्यानं सरकारचं लक्ष वेधून घेत आहेत. आशिष शेलार यांनी रात्री खेळ चाले मालिकेतील पांडू या पात्राचा संदर्भ देत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना टोला लगावला आहे.

राज्यात करोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारनं सर्व निर्णय लांबणीवर टाकले होते. विद्यापीठांच्या परीक्षांचा निर्णयही करोनामुळे अजून होऊ शकला नाही. काही दिवसांपूर्वी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कुलगुरूंसोबत एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत अंतिम परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना कुलगुरूंना दिल्या होत्या. या निर्णयानंतर राज्यपालांनी युजीसीच्या नियमाप्रमाणे परीक्षांचा निर्णय होईल, असं राज्य सरकारला कळवलं होतं. त्यामुळे हा निर्णय अजून भिजत पडला आहे.

आणखी वाचा- … ही महापालिका आणि राज्य सरकारची जीवघेणी बनवाबनवी : अतुल भातखळकर

दरम्यान, भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी परीक्षेच्या मुद्यावरून उच्च शिक्षणमंत्री यांना चिमटा काढला आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेतील पांडू पात्राचा संदर्भ देत शेलार यांनी उच्च शिक्षणमंत्र्यांना परीक्षेच्या निर्णयाची आठवण करून दिली आहे. “‘रात्रीस खेळ चाले’मध्ये पांडू ‘इसरतो’ तसे आमचे कोकणचे उच्च शिक्षण मंत्री निर्णयाची ‘योग्य वेळ’ इसरले की काय? नाहीतर म्हणायचे, काय त्या? परीक्षा कित्याक…? अण्णानु ‘इसरलंय’ म्हणून आठवण करून देतो. विद्यार्थी हित आणि एटीकेटीच्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा पाठपुरावा,” अशा शब्दात शेलार यांनी चिमटे काढले आहेत.

आणखी वाचा- “याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह!”; ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’मधील ‘या’ नकाशावरुन भाजपाने साधला निशाणा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्रेणी पद्धतीनं गुण देण्याचा निर्णय न घेता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून कळवलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असं उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले होते. मात्र, परीक्षेसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही.