कंगना रणौतचं ऑफिस बुलडोझरने पाडणं, तिला मुंबईत पाय ठेवू देणार नाही या घोषणा देणं हा मर्दपणा होता का? कुणाच्या बायका – मुलांना ईडीची नोटीस आली  तर संजय राऊत यांना त्यात नामर्दपणा दिसतो. मग कंगनाविरोधात जी कारवाई केली तो मर्दपणा होता का? कंगनाविरोधात जो आकांडतांडव केला तो मर्दपणा होता का? असे प्रश्न विचारत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेवर कडाडून टीका केली आहे.  ईडीच्या एका नोटिशीमुळे संजय राऊत चांगलेच हादरले आहेत. त्यांनी दमबाजी करु नये. भाजपा दमबाजीला भित नाही असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले आशिष शेलार?

“संजय राऊत यांनी उगाच “डराव डराव” करू नये. दमबाजी तर मुळीच करू नये. ईडीच्या एका नोटीसमुळेच ते हादरले आहेत. त्यापेक्षा मुकाट्याने दाम – दमडीचा हिशोब ईडी कार्यालयात जाऊन द्यावा.  ईडीने नोटीस पाठवल्या नंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिलेल्या इशाऱ्यांवर आ. आशिष शेलार अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, माजी मंत्री प्राचार्य अशोक उईके, आ. आकाश फुंडकर, आ. प्रताप अडसड प्रामुख्याने उपस्थित होते.

संजय राऊत बोलतात ते तथ्यहीन आहे. एका नोटीसमुळेच ते हादरले आहेत. ईडीने नोटीस दिली आहे तर प्रथम त्यांनी दाम – दमडीचा हिशोब देऊन स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करावे. कर नाही तर डर कशाला ? डराव डराव करण्यापेक्षा हिशोब द्यावा. सीबीआय असेल, ईडी असेल अशा एजन्सीजवर दबावतंत्र टाकण्याचे काम शिवसेना सातत्याने करते आहे. यामुळे या एजन्सीजचे पावित्र्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. नाहक भाजपा नेत्यांकडे इशारा करून दमबाजी करू नये. संजय राऊत हे महाराष्ट्राचेच आहेत. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत या परिवाराचाच एक भाग मानतो म्हणून आमच्याही मनात त्यांच्याविषयी सहृदयता आहे. पण अशा दमबाजीने काय साध्य होणार? असा प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला.