24 September 2020

News Flash

देशातील पहिले अशोकचक्र मराठवाड्याच्या मुक्तीसाठी!

हवालदार बचित्तर सिंह यांच्या बलिदानाचा जाज्वल्य इतिहास

रवींद्र केसकर, उस्मानाबाद

पायाच्या मांडीत सर्रकन येऊन बंदुकीची गोळी घुसली. रक्तबंबाळ अवस्थेत पाऊलही पुढे टाकता येईना. समोरून एलएमजी गोळ्यांचा पाऊस सुरू. स्वतःला जमिनीवर फरफटत नेऊन शत्रूला एकट्याने गारद केले. गंभीर जखमी असताना रांगत जाऊन शत्रूच्या तळावर हातगोळे फेकले. ही जीवघेणी जखम अखेर जीवावर बेतली. पण निजामाच्या सैनिकांना पराभवाची धूळ चारून हा पंजाबी सरदार देशाच्या कामी आला. निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी कामी आलेल्या शीख रेजिमेंटच्या हवालदार बचित्तर सिंह यांना अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. बचित्तर सिंह देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक ठरले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा १३ महिने पारतंत्र्यात होता. रझाकाराच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी अनेकांनी प्राणाची बाजी लावली. त्यात हवालदार बचित्तर सिंह यांचे शौर्य अभूतपूर्व आहे. दुर्दैवाने प्राणपणाने झुंजणाऱ्या बचित्तर सिंह यांच्या बलिदानाचा इतिहास या परिसरात आजही दुर्लक्षित आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी देश संस्थानांमध्ये विखुरलेला होता. देशभरातील ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी सहमती दर्शविली. मात्र काश्मीर, जुनागड आणि हैदराबादचा निजाम यांनी स्वतंत्र भारतात विलीन होण्यास नकार दिला. शीख रेजिमेंटच्या जवानांवर निजामाचा निप्पात करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. आणि या तुकडीचे नेतृत्व करीत होते हवालदार बचित्तर सिंह…

आई-वडिलांना एकुलते असलेले बचित्तर सिंह यांचा जन्म पंजाबमधील लोपो नावाच्या एका छोट्या गावात झाला. देश स्वतंत्र होण्यापूर्वी वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी ते सैन्यदलात दाखल झाले. ग्रीस आणि दक्षिण आफ्रिकेतही त्यांनी स्वतःच्या शौर्याची चुणूक दाखवून दिली. दुसऱ्या महायुद्धात दक्षिण आफ्रिकेत त्यांनी गाजविलेल्या शौर्याचे दाखले आजही दिले जातात. मराठवाड्यातील बहुतांश नागरिकांची इच्छा असतानाही निजाम स्वतंत्र भारतात सामील होण्यास तयार नव्हता. त्यासाठी भारतीय सैन्यदलातील शीख रेजिमेंटवर निजामाला शरण आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. आणि या तुकडीचे नेतृत्व हवालदार बचित्तर सिंह यांच्यावर सोपविण्यात आले होते.

बचित्तर सिंह आपल्या दोन तुकड्यांसाह सोलापूर मार्गे १३ सप्टेंबर १९४८ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास नळदुर्गजवळ पोहचले. समोर नाकाबंदी करण्यात आली होती. त्याचवेळी समोरून दोन मोठ्या गाड्या त्यांच्या दिशेने येताना दिसल्या. बचित्तरसिंह यांनी आपल्या साथीदारांना फायरिंगचे आदेश दिले. दोन्ही बाजुंनी अंधाधुंद गोळीबार सुरू झालं. बचित्तर सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी शौर्याच्या जोरावर दोन्ही वाहनांवर ताबा मिळविला. त्याच वेळी शत्रुसैन्याने सुरक्षित जागा पाहून बचित्तर यांच्या तुकड्यांवर गोळ्यांची बरसात सुरू केली. मोठ्या धैर्याने बचित्तर सिंह यांनी शत्रूला सामोरे जात त्यांच्या गोळ्यांचा मुकाबला केला. त्याचवेळी एक गोळी त्यांच्या मांडीत घुसली. केवळ ३० यार्ड अंतरावर असलेल्या शत्रूचा तळ बचित्तर यांनी रांगत जाऊन गाठला आणि. दोन हातगोळे टाकून शत्रूचा तळ कायमचा शांत केला. गंभीर जखमी असतानाही रणांगण न सोडता बचित्तर यांनी आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित केले. हवालदार बचित्तर सिंह यांच्या शौर्य आणि प्रेरणेने भारतीय सैन्याने निजामाला शरण येण्यास भाग पाडले. मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अमूल्य शौर्य गाजवून मृत्यूला मोठ्या धौर्याने सामोऱ्या गेलेले हवालदार बचित्तर सिंह शांतता काळातील सर्वोत्तम पुरस्कार पटकविणारे देशातील पहिले अशोक चक्र विजेता ठरले.

स्मृतींना उजाळा मिळायला हवा- सहस्त्रबुद्धे

बचित्तर सिंह यांनी गाजविलेले शौर्य शब्दातीत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी सैनिकांनी अनेकदा असेच अतुलनीय साहस सिद्ध केले आहे. त्यांच्या स्मरणात पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आदी ठिकाणी स्मृतिस्तंभ उभारण्यात आले आहेत. मराठवाडा मुक्तीसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या बचित्तर यांच्याही स्मृतींना उजाळा मिळेल असा प्रयत्न व्हायला हवा. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदार सिंग हे शीख बटालियनचे सैनिक राहिले आहेत. याबाबत त्यांच्याशी आपण पत्रव्यवहार केला आहे. शीख बटालियन आणि भारतीय सैन्यदलाच्या सहकार्यातून बचित्तर सिंह यांच्या बलिदानाचा जाज्वल्य इतिहास जिवंत करणारे स्मारक उभारणीसाठी त्यांनी अनुकूलता दर्शीवली आहे. या परिसरातील नागरिकांनीही त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत नौदलातील वरीष्ठ अधिकारी संजय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 5:59 pm

Web Title: ashok chakra award winner havildar bachittar singh sikh regiment vjb 91
Next Stories
1 MPSC : उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रात करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन
2 नोकरीची सुवर्णसंधी! राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती; करोना संकटात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
3 निजामांना मिळणाऱ्या ३०६ कोटीच्या संपत्तीचा लाभ राजुरा क्षेत्रातील मूलनिवासींना मिळावा!
Just Now!
X