अशोक चव्हाण यांची टीका

राष्ट्रवादीबरोबर संग केल्यानेच काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान झाल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे बोलताना केली. नगरपालिका निवडणूक प्रचारसभेत चव्हाण बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवत चव्हाण म्हणाले की, राज्यात गेली अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दरम्यान आघाडी राहिली. पण या आघाडीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. या आघाडीमुळेच राज्यातील बऱ्याच भागांत काँग्रेसमधील अनेक सक्षम कार्यकर्त्यांना संधीपासून दूर राहावे लागले. गेल्या २० वर्षांत यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या छुप्या मैत्रीचा दाखला देत चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी नेतृत्वाच्या दुटप्पी राजकारणाला जनतेने आता ओळखले आहे. हे यापूर्वी अनेक प्रसंगांमधून जनतेसमोर आलेले आहे. काळ्या पैशांविरुद्ध मोहीम सुरू करणारे पंतप्रधान भारतात परतल्यावर पहिलाच कार्यक्रम शरद पवारांबरोबर घेतात आणि या कार्यक्रमातही राष्ट्रवादीचे नेतृत्व पंतप्रधानांचे आम्हाला सहकार्य लाभल्याचे सांगायला विसरत नाहीत, हे सारेच संशयास्पद आहे. भाजप, राष्ट्रवादीचे हे दुटप्पी राजकारण जनतेने ओळखले असल्याने सध्याच्या स्थानिक निवडणुकांमध्ये लोक या नेत्यांना धडा शिकवल्याखेरीज गप्प बसणार नाहीत, अशी टीका चव्हाण यांनी केली. या वेळी जयकुमार गोरे यांनीही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने विकासापेक्षा घराघरांत भांडणे लावण्याचेच काम केल्याची टीका केली.