शोध कोणी लावला कोणास ठाऊक – अशोक चव्हाण

उस्मानाबाद जिल्ह्य़ात सोन्याचा मुलामा दिलेल्या ताटात शाही भोजन केल्याच्या आरोपाचे कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात खंडन केले आहे. ते कार्यकर्त्यांच्या घरातील प्रेमाने दिलेले जेवण होते. याबाबत होत असलेला प्रचार चुकीचा असून हा शोध कोणी लावला कोणास ठाऊक, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी नेतेमंडळी उस्मानाबाद जिल्ह्य़ात आली होती. सभेपूर्वी उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे एका कार्यकर्त्यांच्या घरी या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी भोजनाचा आस्वाद घेताना त्यांच्यासाठी नांदेड येथून आचाऱ्याकडून मागविण्यात आलेल्या सोन्याचा मुलामा दिलेल्या ताटांची व्यवस्था करण्यात आल्याचे वृत्त आहे.

यासंदर्भात सोलापुरात एका पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी, सोन्याचा मुलामा दिलेल्या ताटात आपण शाही भोजन केल्याच्या वृत्ताचे खंडन केले.

राज्यात भाजप व शिवसेनेत चाललेल्या कलगीतुऱ्याकडे लक्ष वेधले असता चव्हाण यांनी, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मराठी माणसांची अस्मिता असेल तर त्यांनी राज्यातील व केंद्रातील सत्तेतून बाहेर पडावे, असे आवाहन केले. भाजप व शिवसेनेचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप म्हणजे केवळ एक नाटक आहे, अशा शब्दात त्यांनी दोन्ही पक्षांवर टीकास्त्र सोडले.

नाशिक महापालिका निवडणुकांसाठी भाजपच्या शहराध्यक्षाने उमेदवारी देण्याकरिता दोन लाखांची रक्कम मागितल्याच्या कथित घटनेविषयी बोलताना चव्हाण यांनी सामान्यजनांना कॅशलेसचे आवाहन करायचे आणि नेत्यांनी मात्र उमेदवारीसाठी दोन-दोन लाखांची रोकड मागायची, हे कसले सोंग, अशा शब्दात भाजपची खिल्ली उडवली.