आघाडीमुळेच सत्तेत असल्याचे भान ठेवावे
राज्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेश काँग्रेसचे काम अतिशय उत्तम आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता या नात्याने आपण मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. दोन्ही काँग्रेसची आघाडी असल्यामुळेच राज्यात आपण सत्तेत आहोत याचे भान मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ठेवले पाहिजे, अशी खोचक प्रतिक्रिया देत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून टोला लगावला.
चव्हाण यांनी आज शिर्डीला साईबाबांचे सपत्नीक दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन कोते, राजेश परजणे, विकास आढाव, अशोक खांबेकर आदी या वेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने सरकार आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कुरघोडीचे राजकारण करण्यापेक्षा दुष्काळाच्या प्रश्नावर एकत्र कामे केल्यास दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. राज्याला दुष्काळ नवा नाही, दर वर्षी कमी-अधिक प्रमाणात तो असतो. यंदा मात्र मराठवाडय़ात त्याची तीव्रता अधिक आहे. दुष्काळी स्थितीचा संयुक्तपणे मुकाबला करणे गरजेचे आहे. राज्यात सिंचनाचे प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. कामे अधिक आणि निधी कमी अशी परिस्थिती असल्याने सिंचन प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत, असे स्पष्ट करून चव्हाण म्हणाले, युवक काँग्रेसपासून आपण पक्षाचा पाईक म्हणून काम केले आहे. सध्याही आपण पक्षीय राजकारणात सक्रिय आहोत, भविष्यात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.