काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची खोचक प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या चच्रेअंती शेतकरी संप मिटल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ काल सकाळी झळकली, पण या सर्व घडामोडींची खिल्ली उडवताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सक्सेस बट पेशंट इज डेड’ अशी टिप्पणी येथे केली.

गेल्या गुरुवारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे फडणवीस सरकारची मोठी कोंडी झाली होती. दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याने राज्यभर या संपाबद्दल अनुकूल-प्रतिकूल चर्चा झाली, पण संपात पुढाकार घेणाऱ्या काही नेत्यांसोबत प्रदीर्घ चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी संप संपुष्टात आणल्याची बातमी सकाळी झळकली. पण सध्या नांदेड मुक्कामी असलेले माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय कोणाचेही समाधान होणार नसल्याचे येथे स्पष्ट केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्यावर शेतकऱ्यांच्या बाबतीत वर्गवारी कशासाठी, असा सवाल करून मुख्यमंत्री व त्यांच्या सरकारने जुजबी आश्वासने देत, संपकऱ्यांमध्ये फूट पाडल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कर्जमाफीची मागणी घेऊन काँग्रेसने संपूर्ण राज्यात संघर्ष यात्रा काढली. आम्ही सरकारकडे केलेल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत सरकारविरोधी आंदोलन सुरूच राहील, असेही ते म्हणाले.

शेतमालाचा हमीभाव सरकारने निश्चित करून द्यायचा असतो, पण बाजारात जेव्हा हमीभाव मिळत नाही तेव्हा सरकारने त्यात हस्तक्षेप करायचा असतो, असे सांगून खासदार चव्हाण म्हणाले, की ‘काही निवडक संपकरी नेत्यांशी चर्चा करून फडणवीस सरकारने वेळ मारून नेली. त्यामुळे आमचे समाधान झाले नाही.’

शेतकऱ्यांच्या संपामुळे सरकार घाबरले होते. काही तरी केले असे त्यांनी आता भासवले आहे. पण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, ही आमची मागणी कायम असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

फडणवीस यांचे नांदेडमध्ये स्वागत

दरम्यान, परळी येथील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, राज्याचे मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे शनिवारी सकाळी नांदेड येथे आगमन झाल्यानंतर विमानतळावर स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख यांनी शुक्रवारी संपूर्ण पाठिंबा दर्शवला होता.

मुख्यमंत्र्यांच्या आगमनाप्रसंगी त्यांच्याच पक्षाचे प्रताप पाटील चिखलीकर व सुभाष साबणे हे दोन आमदान आवर्जून हजर होते. भाजपतर्फे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, संजय कौडगे आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकारीही या वेळी हजर होते.