काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी
राज्यात दुष्काळी स्थिती असून गेल्या १३ महिन्यात ३ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने राज्याला दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.
काँग्रेसने मंगळवारी विविध मागण्यांसाठी विधान भवनावर मोर्चा काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. दुष्काळाबाबत सभागृहात निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्रांनी सांगितल्याचे चव्हाण म्हणाले.
गेल्या वर्षभरात देशात झालेल्या विविध निवडणुकांमधून जनतेने भाजपविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. हीच अवस्था महाराष्ट्रात असून त्याची प्रचिती मोर्चात दिसून आली आहे. संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्तपणे या मोर्चात सुमारे दीड लाख जनता सहभागी झाली होती, असा दावा चव्हाण यांनी केला. मराठवाडय़ात प्यायला पाणी नाही, खायला अन्न आणि हाताला रोजगार नाही. ग्रामीण भागात जेमतेम तीन तास वीज पुरवठा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर असल्याने नव्याने कर्ज मिळत नाही. सरकारने दुष्काळ निवारण्यासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून जे काही करायचे आहे ते करावे, पण आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी तातडीने जाही करावी, असेही ते म्हणाले.

..तर राजकारण सोडेन -पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्री दोन-तीन वर्षांत राज्यावरील कर्ज फेडू, असे सांगत फिरत आहेत. गेल्या १३ महिन्यात एक रुपयांचे तरी कर्ज कमी झाल्याचे सरकारने दाखवल्यास राजकारण सोडून देईन, असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिले. स्थानिक स्वराज्य संस्था कर रद्द झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी महापालिकांकडे पैसा नाही. या वेतनासाठी पेट्रोल-डिझेलवर २ रुपये अधिभार लावण्यात आला आहे, पण त्याला दुष्कळ कर, असा बनाव करण्यात आला, असेही ते म्हणाले.