औरंगाबाद शहराचा एम्स इन्स्टिटय़ूट (असोसिएशन फॉर इंडियन मॅनेजमेंट स्कूल) सुरू करण्यासाठी विचार केला जावा, या मागणीची शिफारस करण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. केंद्राची ही घोषणाच फसवी असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. येथे आयोजित विभागीय मेळाव्यानंतर ते पत्रकार बठकीत बोलत होते. ही संस्था उभारण्यास ६०० ते ६५० कोटी रुपयांची तरतूद लागते. मात्र, कमी निधीत हे काम कसे होईल, असा सवाल करीत त्यांनी एम्सची शिफारस करण्याची मागणी धुडकावून लावली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही मागणी जोरदारपणे केली होती.
एम्स सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यायचा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून केवळ शिफारस पत्र पाठवावे लागते. तेवढे पाठविले, की मग केंद्रात मराठवाडय़ाचे खासदार म्हणून राजीव सातवसह लढेन, असे सांगत अशोकरावांनी लोकप्रिय घोषणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भाषणात तो विषय टाळलाच. पत्रकार बठकीतही एम्स होणारच नाही, असे सांगत शिफारसपत्राचा विषय मुख्यमंत्र्यांनी टाळला. विभागीय मेळाव्यात मराठवाडय़ाचा पाणीप्रश्नही सामोपचाराने सोडवावा, असे सांगून जायकवाडीप्रश्नी भूमिका घेण्याचेही टाळले.
पाणीप्रश्नी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राने सामोपचाराने चर्चा करावी, असे त्यांनी सांगितले. या प्रश्नी निर्णय घ्यायला उशीर झाला आहे काय, यावरही त्यांनी सामोपचाराचीच गरज असल्याचे सांगून विषयाला बगल दिली. तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हक्काचे पाणी मिळायला हवे, अशी जाहीर भूमिका घेतली. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अधिकारी काय काम करतात, असा सवाल उपस्थित केला. मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचे टाळले. अशोकरावांनी केलेल्या बहुतांश मागण्यांकडे त्यांनी कानाडोळाच केला. वैजापूर येथील रामकृष्ण उपसासिंचन योजनेसाठी ६५ कोटी रुपये मंजूर केले, तर शेतकऱ्यांच्या सात-बारावर पडलेला बोजा दूर होईल. त्याबाबतचा निर्णय घेतला जावा, अशी विनंती चव्हाण यांनी केली होती. भाषणाच्या शेवटी या मागणीचा सकारात्मक विचार करू, असे चव्हाण यांनी सांगितले.
मेळाव्यात मंत्री मधुकरराव चव्हाण, राजेंद्र दर्डा, अमित देशमुख व डी. पी सावंत यांची भाषणे झाली. पालकमंत्री बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनीही भाषणात लोकसभेतील पराभव केवळ प्रचारतंत्रातील कमकुवतपणा असल्याचे सांगितले.
महिला नेत्यांना डावलल्याची भावना
मेळाव्यात खासदार रजनीताई पाटील व महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे यांना भाषणाची संधीच दिली नव्हती. महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्या भाषणापूर्वी ही बाब रजनीताईंनी लक्षात आणून दिली. त्यामुळे कमल व्यवहारे यांनी बोलावे, असे सूत्रसंचालकाने जाहीर केले. मात्र, खासदार रजनीताईंनी बोलावे, असा आग्रह कमलताईंनी धरला. त्यानंतर खासदार रजनीताईंनी उपस्थितांना तसे सुनावलेच. त्या म्हणाल्या, की आपण व्यासपीठावरचे सर्व जण एका महिलेमुळे म्हणजे सोनिया गांधी यांच्यामुळे बसतो आहोत, हे विसरून चालणार नाही. ५० टक्के महिला मतदार असतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.
उत्तमसिंह पवारांच्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी
काँग्रेसमध्ये विधान परिषदेवर न घेतल्याने नाराज असणारे माजी खासदार उत्तमसिंह पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मेळावा सुरू होण्यापूर्वी घोषणाबाजी सुरू केली. त्यांची घोषणाबाजी लक्षात येताच पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार यांनी, सभागृहात कोणाच्याही घोषणा द्यायच्या नाहीत, असे बजावले. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणी घोषणाबाजी करणार असेल, तर पोलीस बघून घेतील. त्यांना नाही जमले तर सगळीकडे माणसे पेरून ठेवली आहेत. त्यामुळे पुढे येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जागा नाही. त्यांना बाहेर हाकला, असे ते म्हणाले. मंत्र्यांचा आदेश मानून पोलिसांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट पोलीस ठाण्याचे दर्शन घडविले.