महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्लीतील सरकारी वकिलांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या प्रकरणाचा आढावा घेतला. आज झालेल्या भेटीत अशोक चव्हाण यांनी सरकारी वकील राहुल चिटणीस आणि सचिन पाटील यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणावर तोडगा काढा कोणतीही उणीव ठेवू नका असं या चर्चेत चव्हाण यांनी सांगितल्याचंही समोर येतं आहे. सरकारी वकिलांशी भेट घेऊन मराठा आरक्षण प्रकरणाचा आढावा घेतल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील SEBC प्रवर्गावर गंभीर परिणाम झाले आहेत. त्यावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने ही चर्चा झाल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी तातडीने खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी लेखी मागणी यापूर्वी महाराष्ट्र सरकारने तीनवेळा केली आहे. राज्य शासनाच्या या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचं सरन्यायाधीशांनी २ नोव्हेंबर रोजी सांगितलं होतं. यासंदर्भातला अर्ज २० सप्टेंबरला करण्यात आला होता. तसंच ७ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबर रोजीही तो मेन्शन करण्यात आला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. आम्ही मराठा समाजाला न्याय देऊ त्यांनी मोर्चे काढू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं होतं. मात्र मराठा समाजाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. आता याच अनुषंगाने हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी अशोक चव्हाण यांनी दिल्लीतल्या वकिलांशी चर्चा केली आहे.