नांदेडमधील समारंभात काँग्रेसजनांकडून पदवाटप

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एक-दीड वर्ष दूर आहे, पण नांदेड जिल्ह्य़ातील काँग्रेसजनांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आणि आमदार अमिता चव्हाण यांना खासदारकी अशी पदांची वाटणी येथे जाहीर करून टाकली. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्ती, खासदार राजीव सातव यांनीही या वाटणीला अनुकूलता दर्शवताना चव्हाण यांनी टिळक भवनातून ‘वर्षां’वर जावे, असा सदिच्छापर वर्षांवही केला!

खासदार अशोक चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी ते आपल्या कर्मभूमीत दाखल झाले. याच निमित्ताने जिल्हा आणि शहर काँग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी रात्री चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी नांदेडबाहेरून खासदार सातव यांच्यासह आमदार अब्दुल सत्तार, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांची तसेच जिल्ह्यातील आजी-माजी आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या सत्कार समारंभाचे मुख्य संयोजक, काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात खासदार चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षांचे आभार मानले. चव्हाण यांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळायला हवे, असा सूर त्यांनी काढला. अशोक चव्हाण यांच्या शेजारी अमिता चव्हाणही व्यासपीठावर विराजमान होत्या. त्यांच्याकडे पाहून आमदार अब्दुल सत्तार यांनी आता पुढील निवडणुकीमध्ये दोघांच्या खुर्चीत अदलाबदल व्हावी असे सुचवले आणि नंतर खासदार राजीव सातव यांनी अशोक चव्हाण यांनी टिळक भवनातून ‘वर्षां’वर जावे, अशी सदिच्छा आपल्या भाषणातून व्यक्त केल्यामुळे संपूर्ण सत्कार समारंभ पदांच्या वाटणीवर केंद्रित झाला.

सत्कारानंतर स्वत: चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढविणे न लढविणे यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पण ते म्हणाले, की ‘काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नांदेड मनपातील यशावर न थांबता, आपले लक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर ठेवले पाहिजे. मुख्यमंत्री कोणीही होवो, राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली पाहिजे, यासाठी आपण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत.’ या वेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टीका करताना राज्यात केवळ घोषणांचा पाऊस सुरू आहे, कृती मात्र नाही असे नमूद केले.   समारंभात ईश्वरराव भोसीकर, आमदार वसंतराव चव्हाण, डी. पी. सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन संतुका पांडागळे यांनी केले.

जनतेचे प्रेम विसरणार नाही

तीन दशकांच्या राजकीय जीवनात खासदारकी, दीर्घकाळ मंत्रिपद, मुख्यमंत्रिपद मिळाले. आता पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी निवड, हे सर्व नांदेडकरांच्या अलोट प्रेमामुळे मिळाले असल्यामुळे जनतेचे प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.