अशोक चव्हाण निर्दोष आहेत. त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत. एखादा माणूस तावून सुलाखून निघाल्यावर जसा मजबूत होतो, त्याच स्थितीत आज अशोकराव आहेत, असे ‘प्रमाणपत्र’ काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी चव्हाण यांना दिले.
नांदेडमधील आघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ नवा मोंढा मदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उमेदवार चव्हाण, पालकमंत्री डी. पी. सावंत, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, खासदार भास्करराव खतगावकर, आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, बापूसाहेब गोरठेकर, प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासह अशोक चव्हाण यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य आपणास मिळाले, असेही सिंग यांनी सांगितले. नरेंद्र मोदींवर टीका करताना ते म्हणाले की, दंगली घडवून राजकारण करण्यात धन्यता मानणाऱ्यांना गंगा-जमुना संस्कृती मान्य नाही. तसे निवडणूकपूर्व सर्वेक्षण म्हणजे पसे देऊन रचलेले थोतांड आहे. त्याकडे लक्ष देऊ नका, असेही ते म्हणाले. मोदींचा उल्लेख ‘महाफेकू’असा करीत भाजप हा दलाल व ठेकेदारांचा पक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला.
पवार यांनीही मोदींवर टीका करताना गुजरातचा विकास झाला, हे खरे. पण तो मोदींच्या काळात नव्हे, तर काँग्रेसच्या राजवटीत झाला. उलट गेल्या १० वर्षांत तेथील विकासदर घटल्याचा आरोप केला. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी, अमरसिंह चौधरी, चिमनभाई पटेल यांच्या कारकिर्दीत विकासदर १६ ते साडेसतरा टक्के होता. गुजरातची सूत्रे मोदींनी घेतल्यानंतर त्यात घट झाली. आज हा दर केवळ साडेआठ टक्के आहे. विकासाचे हे मॉडेल देशाला देणार आहात का, असा सवाल पवार यांनी केला.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य गुजरातपेक्षा कसे विकसनशील आहे, याचे दाखले दिले. गुजरातमध्ये पोलीस वा पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी होतो. गुजरातपेक्षा महाराष्ट्र किती प्रगतीपथावर आहे, याची खुली चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. औरंगाबादनंतर नांदेड दुसऱ्या क्रमांकाचे औद्योगिक शहर करण्याचा विचार असल्याचे चव्हाण म्हणाले. माधवराव पाटील, हाणमंतराव पाटील, वसंतराव चव्हाण, ओमप्रकाश पोकर्णा, अब्दुल सत्तार, शंकरअण्णा धोंडगे, रावसाहेब अंतापूरकर आदी उपस्थित होते.