नांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर झाल्याच्या वृत्तानंतर अशोक चव्हाण यांनी गुरुवारी हक्काच्या मतदारसंघात तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. काँग्रेसमधून जे गद्दार गेले ते बरे झाले, असे एकमेव राजकीय वक्तव्य करत त्यांनी युती सरकारवर टीकास्र सोडले. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. नांदेड आणि भोकर या ठिकाणी काँग्रेसच्यावतीने आज निदर्शने करण्यात आली.

युती सरकारच्या काळात  भ्रष्टाचार बोकाळला असून शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकार गंभीर नाही. त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. सत्तेसाठी भुकेल्या असलेल्या सरकारला खाली खेचा, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.  या वेळी काँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, डी. पी. सावंत, महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, कार्यकत्रे सहभागी झाले होते.

जिल्ह्यतील प्रशासन व सत्ताधारी पुढारी यांचे संगनमत असून त्यांनी कोटय़वधी रुपयांची लूट सुरू केली असल्याची टीका चव्हाण यांनी केली. काँग्रेसमधील काही कार्यकत्रे पक्ष सोडून गेले आहेत.

काँग्रेसमधील गद्दार गेले ते चांगले झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचा संदेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.