काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये अशोक चव्हाण चंद्रपुरातील उमेदवारीबाबत बोलताना पक्षात माझं कुणीही ऐकत नाही, मीच राजीनामा देण्याच्या तयारीत आहे असं सांगताना ऐकू येत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अशोक चव्हाण यांनीच ती ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती असा आरोप केला आहे. पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी अशोक चव्हाण यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी तसंच तिकीट बदलण्यासाठी भाग पाडलं जावं याकरिता अशोक चव्हाण यांनीच ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करायला सांगितली आणि व्हायरल केली. तसंच अब्दुल सत्तार यांनीही अशोक चव्हाणांच्या सांगण्यावरुन राजीनामा दिला असं विनोद तावडे यांनी सांगितलं आहे.

व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अशोक चव्हाण हे राजीनाम्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली होती. ऑडिओ क्लिपमध्ये अशोक चव्हाण चंद्रपुरातील एका कार्यकर्त्याशी बोलत होते. हा कार्यकर्ता चंद्रपुरातल्या जागेबाबत बोलत असताना अशोक चव्हाण त्याला सांगत आहेत की पक्षात माझं कोणीही ऐकत नाही.

अशोक चव्हाण यांनी या संदर्भात बोलताना असे स्पष्टीकरण दिले होते की, खासगी संभाषण पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही. हे सगळे अंतर्गत विषय आहेत, चंद्रपुरात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे हे माझे काम आहे. मी क्लिप ऐकलेली नाही, चंद्रपूर संदर्भात वादाचे विषय असल्याने कार्यकर्ते नाराज आहेत असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं.