पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. तशातच आता विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी लवकरच या मुद्द्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

“गेल्या १२ दिवसांपासून देशातील अनेक शेतकरी दिल्लीत ठिय्या आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने पारित केलेले शेतकऱ्यांसंबंधीचे कायदे रद्द करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी सुरू आहे. या आंदोलनाला आता विरोधी पक्षांचा पाठिंबा असून आता हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करताना दिसत आहे. केंद्र सरकार सामंजस्याची भूमिका घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांशी केल्या जाणाऱ्या चर्चा निष्फळ ठरत आहेत. काहीही झालं तरी हे कायदे मागे घ्यायचे नाहीत अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. अशा परिस्थितीत झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी ‘भारत बंद’ महत्त्वाचा आहे”, असं रोखठोक मत अशोक चव्हाण यांनी मांडलं.

आणखी वाचा- “…तर शेतकरीच भाजपा नेत्यांना पायातील काढून उत्तर देतील,” सतेज पाटील यांची तिखट प्रतिक्रिया

आणखी वाचा- हा राजकीय बंद नाही, त्यामुळे जनतेने स्वयंस्फुर्तीनं यात सहभागी व्हावं – संजय राऊत

“केंद्र सरकारने पारित केलेले तीन नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असून हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. या आंदोलनाला भाजपा सोडून संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात केंद्र सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना जागे करण्यासाठी ८ डिसेंबरचा ‘भारत बंद’ यशस्वी करायलाच हवा. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात केंद्र सरकारवर दबाव टाकण्याची गरज आहे”, असेही अशोक चव्हाण म्हणाले.