येत्या २८ फेब्रुवारीला राज्य सरकार बरखास्त होणार असून निवडणुकांची घोषणा होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जातील असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना तयारीला लागा अशी सूचना कार्यकर्त्यांना केली आहे. औरंगाबादेतील जाहीर सभेत ते बोलत होते.

भाजपा सरकार सत्तेतून जात नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहणार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. देश का चौकीदार चोर है, बाकी चौकीदार इमानदार आहेत असा टोला त्यांनी यावेळी लगावला. काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नसल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं. अबकी बार आपटी मार असे आवाहन करत त्यांनी जनतेला भाजपाला सत्तेतून खाली उतरवण्याचं आवाहन केलं.

नितीन गडकरी , उद्धव ठाकरे कधी कधी खरं बोलतात असे म्हणंत त्यांनी अच्छे दिन कभी नही आते या गडकरींच्या भाषणातील वाक्याचा पुनरुच्चार केला. तर सरकारकडे गाजरं घ्यायलाही निधी नाही असे उद्धव ठाकरे म्हणंत असल्याचे सांगितले.