विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर अधीक्षक निलंबित

डहाणू तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या तवा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे काविळीची लागण झाली आहे. यातील एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शाळेतील मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना हलगर्जीपणा केल्याने निलंबित केले आहे.

तवा आश्रमशाळेतील २३ विद्यार्थ्यांना उलटी आणि ताप यामुळे शनिवारी कासा उपजिल्हा तपासणीसाठी आले. पालघर दौऱ्यावर असलेल्या आदिवासी विकासमंत्र्यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात अचानक भेट देऊन मुलांच्या आरोग्याची चौकशी केली. त्यानंतर खासदार राजेंद्र गावित आणि आमदार अमित घोडा यांनीही आश्रमशाळेत आणि दवाखान्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

तपासणीनंतर २३ पैकी १३ विद्यार्थ्यांना उलटी आणि ताप असल्याने दाखल करण्यात आले आहे, तर काविळ आजाराने इयत्ता तिसरीतील विद्यार्थी नैतिक नितीन तलहा याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांना दूषित पाण्यातून काविळ झाल्याचे निदर्शनास आले. यात कासा दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले सचिन कवटे (वय १०), प्रतीक कामडी (८), अभिजित पुंजरा (७), करण पुंजरा (९), ऋषिकेश सापटे (१४), प्रतीक पाचलकर (१०), अतुल पापडे (६), अनिल पडवले (११), अतुल धांगडा (१८ ), ऋतिक कडू (११),  अशोक धांगडा (९) हे विद्यार्थी इयत्ता पहिली ते बारावी शिकत आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना अंगाला खाज येणे, ताप व उलटी अशी लक्षणे दिसत होती.

दरम्यान, आदिवासी विकासमंत्री उईके यांनी त्यानंतर तवा आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असता आश्रमशाळेतील पिण्याच्या पाण्यासाठी असलेले पाणी शुद्धीकरण यंत्र बिघडल्याचे निदर्शनास आले असता व याबाबतीत तातडीने कारवाई आणि तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अप्पर आयुक्त ठाणे यांनी प्रभारी मुख्याध्यापक टी. आय. पाटील आणि अधीक्षक आर. आर. गावित याना निलंबित करण्यात आले आहे.