राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी चार हजार चारशे कोटी रुपये कर्ज उभारणीचा प्रस्ताव ‘एशियन डेव्हलपमेंट बँके’कडे देण्यात आला असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले. या माध्यमातून राज्यातील जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांच्या इमारती तसेच उपकरणांची कमतरता भरून निघेल, असे ते म्हणाले. टोपे म्हणाले, भविष्यात सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) वर भर देण्याचा विचार आहे. महाबळेश्वर तालुक्यात अशाप्रकारे केलेल्या प्रयोगाचे परिणाम चांगले दिसून आले आहेत. पुढील काळात करोना व्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय, मूत्रपिंड इत्यादीसह कर्करोग आदी सहव्याधी असलेल्या रुग्णांकडे लक्ष देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात सहव्याधी असलेले २३ लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.