महाराष्ट्र प्रदेश युवक  काँग्रेसच्या सूचनेनुसार आज, गुरुवारी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी तब्बल १६ इच्छुकांनी निवड समितीपुढे मुलाखती दिल्या. त्यामुळे युवकच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. निवड समिती आपला अहवाल युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना सादर करेल, त्यानंतर जिल्ह्य़ातील नेते, प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर ताबे, आ. लहु कानडे यांच्याशी चर्चा करून एक आठवडय़ात जिल्हाध्यक्षाची निवड अपेक्षित असल्याचे निवड समितीचे सदस्य सुजित भोसले (सोलापूर) यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या पाश्र्वभूमीवर युवकची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असते, मात्र त्याला फाटा देऊन निवड समिती स्थापन करण्यात आली. सत्यजित तांबे यांच्या नगर शहराच्या लाल टाकी भागातील कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या.

निवड समिती सदस्य व प्रदेश युवक  काँग्रेसचे सरचिटणीस सुमित भोसले व अभय देशमुख (परभणी) यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. समितीचे तिसरे सदस्य अभिजित शिवरकर अनुपस्थित होते. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, जिल्हा युवक  कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, युवक चे शहराध्यक्ष मयूर पाटोळे, मुबीन शेख, योगेश काळे, हरून इनामदार, फिरोज शेख, चंद्रकांत क्षीरसागर आदींनी सदस्यांचे स्वागत केले.

जिल्हाध्यक्ष पदासाठी स्मितल वाबळे (श्रीगोंदा), ऋषिकेश मुळे (क र्जत), शरद निरंजन पवार (श्रीरामपूर), मोहसीन शेख (नगर शहर), राजू बोरुडे (राहुरी), संदीप दरंदले (नेवासा), प्रसाद शेळके (शिर्डी), श्रीकांत दंडवते (राहाता), राहुल उगले (जामखेड), सचिन रणदिवे( श्रीरामपूर ), सिद्धेश खिलारी (पारनेर), मंगल भुजबळ (नगर शहर), कृष्णा शेळके (क र्जत), तुषार पोटे (कोपरगाव), संचित गिरमे (श्रीरामपूर),अ‍ॅड. अक्षय कुलट (नगर तालुको) यांच्यासह इतर इच्छुकांनी ई-मेलद्वारेही निवड समितीच्या सदस्यांशी संपर्क  करून इच्छा व्यक्त केली.