‘राहुल गांधी मला आवडतात. आणि हे मी आज नाही सांगत, यापूर्वी ही मी हे बोललोय. त्यांनी कधीही फसवी आश्वासनं दिलेली नाहीत. राहुल गांधी यांची नेहमी थट्टा केली जाते. पण गांधी घराण्याने देशासाठी जो त्याग केलाय तो आपण विसरून चालणार नाही. तुम्हाला त्यांची धोरणं पटत नसतील तर त्यावर टीका करा परंतू कुणावरही व्यक्तिगत टीका करणं आपल्याला मान्य नाही. सध्याच्या घडीला राजकारण विखारी होत चाललंय. विष जास्त फुत्कारणारा नेता जास्त लोकप्रिय असा लोकांचा समज आहे. पण हा गैरसमज आहे’, असं मत ज्येष्ठ शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नुकतंच एका कार्यक्रमात मांडलं. २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या आपल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या निमित्ताने कलर्स मराठीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमाचे सूत्रधार मकरंद अनासपुरे यांनी संजय राऊत यांना राजकारणामुळे नाती दुरावतात का, असा प्रश्न केला असता त्यांनी होकार दिला. परंतु राजकारणात मतभेद असतील तरी नाती दुरावली जाऊ नयेत, असं मला तरी वाटतं. याआधीही अनेकदा राजकारणामुळे नाती दुरावल्याची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. ते पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे असे नेते आहेत, जे सर्वाना एकत्र घेऊन पुढे गेले. अडचणीच्या वेळेस जात, धर्म, राजकीय पक्ष न पाहता लोकांच्या पाठीशी उभं रहाण्याचं धारिष्ट्य त्यांनी दाखवलं असं सांगत राऊत यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोणत्या गोष्टी खटकतात, यावर उत्तर देताना राऊत यांनी सांगितले की, मधल्या काळात त्यांनी शिवसेनेवर अकारण टीका करायला सुरुवात केली होती. शिवसेना राजकारणात उभीच राहू नये असा प्रयत्न त्यांनी केला, तो मला खटकला. ‘पण राजकारणात कुणालाही कधीही ब्रेक लागू शकतो. आम्हालाही तो अनेकदा लागला. पण म्हणून राजकारणात कुणीही संपत नाही, हे लक्षात घ्यायला हवं’ असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

बाळासाहेबांच्या आठवणी आणि राजकीय चर्चांवर रंगलेला ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ चा हा विशेष भाग येत्या शुक्रवारी २५ जानेवारीला रात्री सडे नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.