अस्सल पाहुणे इरसाल नमुने हा कार्यक्रम म्हणजे नवीन नवीन किस्स्यांची मेजवानीच जणू. दर आठवड्याला विविध क्षेत्रातील मान्यवर या मंचावर मनसोक्त गप्पा मारयला येतात. केवळच मोनरंजनच नाही तर समाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरही या मंचावर येऊन दिलखुलास गप्पा मारतात. याच मान्यवरांमध्ये आता खासदार पूनम महाजन आणि आमदार पंकजा मुंडे यांचा समावेश झाला आहे. या दोघींनीही राजकारणाबद्दल बोलताना तुफान फटकेबाजी केली आहे. अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकारणातील अनेक गोष्टींवर दोघींनीही मोजक्या पण मिश्किल शब्दात भाष्य केले. मात्र अनेक विषयांवर या दोघींनी आपली मते स्पष्टपणे मांडत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

या दोघींसाठी राजकारणावर आधारीत विशेष खेळ यावेळी घेण्यात आले. यामध्ये नेहमीसारखं रॅपीड फायरप्रमाणेच एक वेगळा खेळही घेण्यात आला. गोलाकार चक्रावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो लावून ते चक्र फिरवल्यानंतर जो फोटो काट्यासमोर येईल त्या व्यक्तीबद्दलची एक चांगली आणि वाईट गोष्ट सांगण्याचा हा खेळ होता. पंकजा मुंडे यांना या खेळाच्या पहिल्याच फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्याबद्दल एक चांगली आणि एक वाईट गोष्ट सांगण्यास कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. यावेळी पंकजा यांनी अगदी मनमोकळेपणे अजित पवारांबद्दलची खटकणारी आणि आवडणारी एक एक गोष्ट सांगितली.

‘कधी कधी मला त्यांचा स्पष्ट वक्तेपणा आवडतो. जे आहे ते बोलतात स्पष्टपणे बोलतात. ही गोष्ट मला आवडते’, असं उत्तर पंकजा यांनी दिले. तर अजित पवारांबद्दलची न आवडणारी गोष्ट म्हणजे पक्ष म्हणून आम्ही ज्या भूमिका मांडल्या वेळोवेळी त्या सर्व भूमिका यामध्ये येतात असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

या कार्यक्रमामध्ये मकरंद यांनी रॅपिडफायर खेळामध्ये दोघींनाही अगदी गोंधळात टाकणारे प्रश्न विचारल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. आता या प्रश्नांना दोघींनीही काय उत्तरे दिली हे कलर्स वाहिनीवर संपूर्ण कार्यक्रम प्रदर्शित झाल्यावरच प्रेक्षकांना समजणार आहे.