टाळेबंदीतही नक्षलवाद्यांचा हैदोस सुरूच आहे. पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी कोरची तालुक्यातील कोटगूल पोलीस मदत केंद्रांतर्गत कोहका-मोकासा गावाजवळ जिवता गणपत रामटेके(४५) या इसमाची गोळय़ा घालून हत्या केली व कमलापूर-लिंगमपल्ली व किष्टापूर नाल्याजवळ रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या सात वाहनांची जाळपोळ केली.

कोटगूल येथील जिवता रामटेके हा पत्नी नीलम हिच्यासह मोहफुले वेचण्यासाठी गेला होता. तेथे एक नक्षल महिला होती. तिने जिवता रामटेकेची पत्नी नीलम हिला तिच्या पतीचे नाव विचारले. काही क्षणांतच दोन नक्षलवादी तेथे आले. त्यांनी नीलमला पकडून ठेवले आणि दुसऱ्या नक्षल्यांनी जिवताला दोनशे मीटर अंतरावर नेऊन गोळ्या घालून हत्या केली. मात्र, आपला पती जिवंत असल्याचे लक्षात येताच नीलमने कोटगूल गाठून तेथील रुग्णवाहिका घटनास्थळी नेली. जिवताला कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परंतु तेथे उपचार न झाल्याने त्यास कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. रस्त्यात जिवता रामटेके याचा मृत्यू झाला. जिवता रामटेके यास एक मुलगा व दोन मुली असून, येत्या २६ एप्रिलला मुलीचे लग्न होते. घटनेचा तपास कोरची पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनात कोटगूल पोलीस मदत केंद्राचे अधिकारी राऊत करीत आहेत. चालू आठवडय़ात नक्षलवाद्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून केलेली ही दुसरी हत्या आहे. याशिवाय नक्षलींनी एकूण सात वाहनांची जाळपोळ केली. कमलापूर-लिंगमपल्ली रस्त्यावरील पुलाच्या कामावर असलेले २ ट्रॅक्टर आणि मिक्सर मशीन जाळल्या. अतिदुर्गम भागात कंत्राटदारांना काम बंद करण्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले होते. मात्र अशाही परिस्थितीत काम सुरू ठेवल्याने नक्षल्यांना एक प्रकारची संधी मिळाली. त्याचाच फायदा घेत त्यांनी ही जाळपोळ केली.

नक्षलींचा विरोध

किष्टापूर येथील नाल्याच्या बांधकामावरील वाहनांच्या जाळपोळीचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे. नक्षलींना न जुमानता पुन्हा काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. किष्टापूर नाल्यामुळे परिसरातील १६ गावे थेट संपर्कात येणार आहेत. त्यामुळे नक्षलींचा या पुलाला विरोध आहे.