News Flash

कांडेकर हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार राजाराम शेळकेची हत्या

हत्या प्रकरणी नारायणगव्हाणचे उपसरपंच राजेश शेळके यांच्यासह कांडेकर कुटुंबातील काही जणांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे.

शेळके एक वर्षांपासून पॅरोलवर

पारनेर : तालुक्यातील नारायणगव्हाणचे तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले व सध्या विशेष पॅरोलवर सुटका झालेला नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. शेळके याची भरदिवसा त्याच्या घराजवळ गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याने तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागात खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणी नारायणगव्हाणचे उपसरपंच राजेश शेळके यांच्यासह कांडेकर कुटुंबातील काही जणांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे.

शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेळके त्याच्या शेतात सुरू असलेल्या शेततळ्याच्या कामावरील मजुरांना सूचना देऊन शेतातील घराकडे परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.

हल्ला झाला त्या वेळी शेळके हा एकटाच होता. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली. धारदार शस्त्राने शेळकेच्या गळ्यावर वार करण्यात आले. त्यात त्याच्या गळ्याला गंभीर जखम झाली.त्याला तातडीने शिरूर (पुणे) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अकरा वर्षांंपूर्वी, १३ नोव्हेंबर २०१० रोजी नारायणगव्हाणचे तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची डोक्यात गोळी घालून भाडोत्री शार्प शूटरकडून हत्या करण्यात आली होती. कांडेकर व माजी सरपंच राजाराम शेळके यांच्यात राजकीय वैमनस्य होते.

हत्या झाल्यानंतर कांडेकर यांचे भाचे व विद्यमान उपसरपंच राजेश शेळके यांनी राजाराम शेळके यांच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी तत्काळ राजाराम शेळके व त्याच्या मुलास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. पुढे मोबाइल सीडीआरच्या मदतीने राजाराम शेळके याने मारेकऱ्यांना सुपारी देऊन कांडेकर यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात आरोप सिद्ध होऊन मुख्य सूत्रधार राजाराम शेळके, त्याचा मुलगा राहुल याच्यासह पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तर एका आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.

राजाराम शेळके अकरा वर्षांंपूर्वी झालेल्या प्रकाश कांडेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी होता. राजाराम शेळके आणि त्याचा मुलगा राहुल व इतरांना या गुन्ह्यत शिक्षा ठोठावण्यात अली होती. शेळके याची हत्या हा बदला घेण्याचा प्रकार असावा असा संशय व्यक्त होत आहे. राजाराम शेळके एक वर्षांपासून विशेष पॅरोलवर बाहेर आला होता.

राजकीय वैमनस्यातून झालेल्या हत्याप्रकरणात राजाराम शेळके व मुलगा जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. त्यांनी यापूर्वी संचित रजा (पॅरोल) मिळावा यासाठी अर्ज केले होते. मात्र पुन्हा वाद उफाळून येऊ नये म्हणून पोलिसांनी शेळकेच्या संचित रजेच्या अर्जाला हरकत घेतली होती. मात्र करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विशेष रजा मंजूर करण्याचा निर्णय घेतला. शेळके व त्याचा मुलाला एक वर्षांंपूर्वी विशेष रजा मिळाली आहे. शेळके यांची हत्या होताना कोणी पाहिलेले नाही. असे आतापर्यंतच्या चौकशीतून पुढे आले आहे.

 – अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 2:22 am

Web Title: assassination rajaram shelke main facilitator kandekar murder case ssh 93
Next Stories
1 लसीकरणातील गोंधळामुळे नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरले
2 पालक हिरावलेल्या पाल्यांना चांदा शिक्षण संस्थेत नि:शुल्क प्रवेश – डॉ. जीवतोडे
3 ‘राजारामबापू’च्या प्रयोगशाळेकडून ‘राजाराम द्रावण’ची निर्मिती
Just Now!
X